मराठवाड्यात मुसळधार; नांदेड, लातूरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस, २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:53 IST2025-08-30T19:52:56+5:302025-08-30T19:53:16+5:30
मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला.

मराठवाड्यात मुसळधार; नांदेड, लातूरमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस, २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवार २८ रोजी दिवसभर व रात्रीतून झालेल्या पावसाचा तडाखा १३० मंडळांत येणाऱ्या २६०० गावांना बसला. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीने विभागात दाणादाण उडवून दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. वार्षिक सरासरी ६७९ मि.मी.च्या तुलनेत विभागात ५७३ मि.मी. म्हणजेच ८४ टक्के पाऊस आजवर झाला आहे.
गुरुवार २८ रोजी विभागात एकूण ६० मि.मी. पाऊस बरसला. यंदाच्या पावसाळ्यात एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस असून, यात लातूर जिल्ह्यात ९१ तर नांदेड जिल्ह्यात १३२ मि.मी. रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. बुधवार २७ ऑगस्ट रोजी विभागातील ४८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर गुरुवारी १३० मंडळांना पावसाने धुतले.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १३२.७ मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत १९० टक्के इतके प्रमाण आहे. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४, बीडमधील १६, लातूरमधील ३६, धाराशिवमधील १, नांदेडातील ६९, परभणीतील १ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडळांत ६५ मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, ३० ऑगस्टपासून पाऊस ब्रेक घेईल, गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती मंडळ, गावांत पाऊस
जिल्हा अतिवृष्टीचे............. मंडळ.........गावे
छ. संभाजीनगर.................... ४.........८०
बीड....................................१६..........३२०
लातूर.............................. ३६.............७२०
धाराशिव.......................... १.................२०
नांदेड............................६९..................१३८०
परभणी....................... १.....................२०
हिंगोली ..................... ३.....................६०
एकूण.................. १३०.........................२६००
गुरुवारी कुठे किती बरसला पाऊस
जिल्हा................. पाऊस (मि.मी.मध्ये)
छ. संभाजीनगर........... २९. ९
जालना ................... १३. १
बीड.....................४८. ४
लातूर .............. ९१. ८
धाराशिव............ १६.१
नांदेड ..............१३२. ७
परभणी............. ३८. ४
हिंगोली.............. १९. ९
एकूण................... ६०.००