चिमुकले बहीण-भाऊ खड्ड्यात पडले; दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 08:01 PM2023-12-15T20:01:14+5:302023-12-15T20:02:19+5:30

खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; बजाजनगरातील हृदयद्रावक घटना

Toddler brother and sister died after falling into pit; Heartbreaking incident in Chhatrapati Sambhajinagar | चिमुकले बहीण-भाऊ खड्ड्यात पडले; दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, पण...

चिमुकले बहीण-भाऊ खड्ड्यात पडले; दोन तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढले, पण...

- शेख मेहमुद
वाळूज महानगर :
मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी बजाजनगरात घडली. चैताली राहुल देशमुख (११) व समर्थ राहुल देशमुख (७, दोघेही रा. बजाजनगर) या दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विद्या राहुल देशमुख या दोन चिमुकल्यांसह तानाजी सरडे यांच्या घरात किरायाने राहतात. विद्या या एका कंपनीत काम करतात तर चैताली ही चौथीत व समर्थ हा इयत्ता दुसरीत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही भावंडे एमआयडीसीचा मोकळा भूखंड (क्रमांक पी ३७) या ठिकाणी खेळण्यासाठी गेली. भूखंडावर मुरूम उत्खनन केल्याने भलामोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तो १० ते १५ फूट पाण्याने भरलेला आहे. खेळत असताना चैताली व समर्थ तेथे पडल्याने बुडाले. हा प्रकार लक्षात येताच लगतच खेळत असलेल्या राजवीर विकास सबर (८) या चिमुकल्याने आरडाओरडा केला. मात्र जवळ कुणीही नसल्याने राजवीरने लगतच्या मैदानावर खेळणाऱ्या तरुणास पाण्यात दोन जण बुडाल्याचे सांगितले.

जीव धोक्यात घालून दोघा तरुणांनी भावंडांना काढले बाहेर
ही माहिती मिळताच न्यू सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विशाल मोरे व गणेश खांडेकर यांनी जीव धोक्यात घालून उड्या घेतल्या. तळाशी असलेल्या चैताली व समर्थ यांना पोलिस व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. घटनास्थळी आलेले दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, उपनिरीक्षक स्वाती उचित, पो.कॉ. बाळू लहरे, तुकाराम पवार, मपोकॉ. प्रियांका तळवंदे यांनी दोघांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

Web Title: Toddler brother and sister died after falling into pit; Heartbreaking incident in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.