धिंड काढलेला गावगुंड टिप्या बिथरला; पुन्हा मकोका लागताच केला पोलिसांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:30 IST2025-10-15T18:30:13+5:302025-10-15T18:30:58+5:30
कुख्यात गुन्हेगार टिप्यावर आतापर्यंत २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

धिंड काढलेला गावगुंड टिप्या बिथरला; पुन्हा मकोका लागताच केला पोलिसांवर हल्ला
छत्रपती संभाजीनगर : दोन वेळा मुख्य बाजारपेठेतून धिंड काढली. हा अपमान असह्य झाल्याने मानसिक संतुलन ढासळलेल्या गावगुंड शेख जावेद ऊर्फ टिप्या मकसूद शेख याने पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केला. न्यायालयातील तारखेला हजर करून कारागृहात सोडताना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी त्याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका व्यापाऱ्याला तलवारीचा धाक दाखवून अडीच लाख रुपये लुटले. आणखी अडीच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी टिप्यावर ३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला होता. जवळपास २ महिने इतरत्र पोबारा केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात टिप्या स्वत:हून न्यायालयात हजर झाला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी त्याला हर्सूल कारागृहात ताब्यात घेत अटक केली. त्यादरम्यान टिप्याची तो दादागिरी करीत असलेल्या परिसरात पहिल्यांदाच दोन वेळा धिंड काढली. हा अपमान असह्य झाल्याने त्याने त्याच वेळी स्वत:चे डाेके फोडून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलिस दिसताच संतुलन बिघडते
१३ ऑक्टोबर रोजी एका गुन्ह्याच्या सुनावणी प्रकरणात पोलिस मुख्यालयातील उपनिरीक्षक कैलास जाधव यांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. काम आटोपून त्याला पुन्हा कारागृहात नेले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाडी थांबवून त्याला कारागृहात नेत असताना त्याने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. जाण्यास नकार देत शिवीगाळ केली. माझ्यावर मकोका का लावला, असे हिंदीतून विचारत पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. कारागृहातून बाहेर आल्यावर सगळ्यांना पाहून घेईल, अशी धमकी दिली. कारागृह पोलिसांच्या मदतीने त्याला नियंत्रणात आणत आत नेण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी त्याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दुसऱ्यांदा मकोका, २८ गुन्हे दाखल
टिप्यासह त्याच्या टोळीवर दोन वेळा मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये त्याच्यावर पहिल्यांदा मकोका लावण्यात आला होता. मात्र, त्यात त्याला जामीन मिळाला. ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा पाेलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाईला परवानगी दिली. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. टिप्यावर आतापर्यंत २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.