थरारक! दारूच्या नशेत वाद उफाळून आले, दोन मित्रांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:03 IST2025-09-18T15:02:16+5:302025-09-18T15:03:33+5:30

भिवधानोरा येथील खून प्रकरणाचा उलगडा; गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडून मित्राची हत्या

Thrilling! Two drunk friends shot a third; one arrested, one absconding | थरारक! दारूच्या नशेत वाद उफाळून आले, दोन मित्रांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या

थरारक! दारूच्या नशेत वाद उफाळून आले, दोन मित्रांनी तिसऱ्याला घातल्या गोळ्या

कायगाव : तीन मित्र दारू पीत बसल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी तिसऱ्यावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडून त्याचा खून केला. त्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाल्याचा प्रकार गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री झाल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी यातील एकास बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास नेवासा फाटा येथून अटक केली. एकजण फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राहुल रमेश नवथर (वय ३५, रा. गळनिंब, ता. गंगापूर) याची अज्ञाताने गोळी घालून हत्या केल्याची बाब समोर आली होती. गंगापूर पोलिसांनी या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यानुसार मृत राहुल नवथर सोमवारी दुपारी कानिफनाथ मावस व योगेश कल्याण नागे (दोघेही रा. भिवधानोरा) या दोन मित्रांसह भिवधानोरा शिवारातील गट क्रमांक ३०६ मधील शेतात दारू पिण्यास बसला होता. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मावस व नागे यांनी राहुलवर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी राहुलच्या डाव्या बरगडीत, दुसरी खांद्यावर, तर तिसरी पोटात लागल्याने राहुल जागीच मृत्युमुखी पडला. मृतदेह तसाच सोडून मावस व नागे घटनास्थळावरून पसार झाले.

मंगळवारी रात्री पोलिस, ठसे तज्ज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गंगापूर पोलिस ठाण्यात मृत राहुलचा भाऊ महेश नवथर यांनी कानिफनाथ मावस याने राहुलला गोळ्या घातल्याची आणि त्यासाठी योगेश नागे याने त्यास मदत केल्याची फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, आरोपी मावस व नागे यांनी राहुलवर का गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वर्चस्ववादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.

पुण्याकडे पळून जाताना ठोकल्या बेड्या
आरोपी योगेश नागे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास नेवासा फाटा (जि. अहिल्यानगर) येथे बेड्या ठोकल्या. गुन्ह्यातील दुसरा आरोपी कानिफनाथ मावस अद्याप फरार असून, त्याने मोबाइल बंद करून ठेवल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

Web Title: Thrilling! Two drunk friends shot a third; one arrested, one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.