थरारक ! इमारतीवरून दोन चिमुकल्यांना खाली फेकून आईने उडी घेतली, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:53 IST2021-05-03T19:50:49+5:302021-05-03T19:53:46+5:30
दुपारी २.३० वाजता दोन्ही मुलांना घेऊन महिला इमारतीच्या छतावर गेली आणि काही कळायच्या आत दोन्ही मुलांना खाली फेकून स्वतःही उडी घेतली.

थरारक ! इमारतीवरून दोन चिमुकल्यांना खाली फेकून आईने उडी घेतली, एकाचा मृत्यू
वाळूज महानगर : लहान मुलांच्या खेळण्यावरून शेजाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून २३ वर्षीय महिलेने १ वर्षाचा मुलगा व ३ वर्षांच्या मुलीला दुमजली इमारतीवरून खाली फेकल्यानंतर स्वत:ही उडी मारली. या दुदैवी घटनेत सोहम (१ वर्ष) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रतीक्षा (३) व अनिता आतकर (२३) या दोघी मायलेकी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना सोमवारी (दि.३) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास बजाजनगरातील जिजामाता कॉलनीत घडली.
सतीश नागनाथ आतकर (२८, रा.बारलोणी, जि.सोलापूर) हे घरची परिस्थिती बेताची असल्याने, दोन महिन्यांपूर्वी कुटुंबासह वाळूज एमआयडीसीत रोजगाराच्या शोधात आले होते. बजाजनगरातील जिजामाता कॉलनीत अभिजीत राजेंद्र गायकवाड यांचे घर भाड्याने घेऊन ते पत्नी अनिता (२३), मुलगी प्रतीक्षा (३), मुलगा सोहम (१) यांच्यासह वरच्या मजल्यावर वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आतकर हे कामासाठी वडगाव परिसरात गेल्यानंतर त्यांच्या पत्नी व मुले घरी होते.
अनिता दुपारी २.३० वाजता दोन्ही मुलांना घेऊन इमारतीच्या छतावर गेल्या होत्या. काही क्षणातच त्यांनी पोटचा गोळा सोहम यास दोन मजली इमारतीच्या छतावरून खाली फेकले. सोहम खाली पडताच, जोराचा आवाज झाला. दारात बसलेल्या घरमालकीण मीना गायकवाड सोहमच्या दिशेने धावल्या. मिना गायकवाड यांनी इमारतीकडे पाहिले असता काही कळण्याच्या आतच अनिताने मुलगी प्रतीक्षाला खाली फेकले व तिनेही खाली उडी घेतली. प्रसंगावधान राखत मीना यांनी चिमुकलीस झेलण्यासाठी हात पुढे केले. मुलगी त्यांच्या हातात येऊन खाली निसटली. त्यामुळे चिमुकलीस जास्त मार लागला नाही व ती बचावली. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहा.निरीक्षक घुनावत, पोलीस मित्र मनोज जैन आदींनी घटनास्थळ गाठून तिघा जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेत सोहमचा मृत्यू झाला. अनिताचे दोन्ही पाय मोडले असून, डोक्याला गंभीर दुखापत झाली. लहानग्या प्रतीक्षाच्या पायाला दुखापत झाली असून, मुका मार लागला आहे. या दोन्ही मायलेकीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शेजाऱ्यांसोबत वाद व मानसिक धक्क्यामुळे उचलले टोकाचे पाऊल
अनिता आतकर यांचे या इमारतीतील इतर भाडेकरूंसोबत लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन-तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या वादावादीनंतर रविवारी तिने मुलगी प्रतीक्षा हिला घरातच बांधून ठेवले होते. सोमवारी पती कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर, अनिताने रागाच्या भरात दुपारी सोहम व प्रतीक्षा या दोन्ही चिमुकल्यांना इमारतीवरून खाली फेकले. स्वत:ही उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, अनिता यांना फिटचा त्रास असल्याचे त्यांचे पती सतीश आतकर यांनी सांगितले. तिच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. मानसिक धक्क्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.