वेरूळमध्ये थरार! चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीनच पळवले, १६ लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 20:20 IST2025-09-11T20:19:43+5:302025-09-11T20:20:27+5:30
अवघ्या १० मिनिटांत १६ लाखांची चोरी! वेरूळ लेणीजवळ एटीएम चोरीचा धक्कादायक प्रकार

वेरूळमध्ये थरार! चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीनच पळवले, १६ लाखांची रोकड लंपास
खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणी समोरील एसबीआय बँकेचे एटीम मशीन पहाटे ३वाजता अज्ञात चार ते पाच चोरट्याने एका छोट्या हत्ती गाडीत घालून लंपास केले असून जवळपास १६ लाख ७७ हजार १०० रूपयांची चोरी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी समोर महामार्गावर एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. आज, गुरूवारी पहाटे ३ वाजता अज्ञात ४ते ५ चोरट्यांनी अगोदर येथील सीसीटीव्ही कॅमेरे स्प्रे मारून बंद केले. त्यांनतर चोरट्यांनी अख्ख एटीएम मशीनच वाहनात टाकत कन्नडच्या दिशेने पसार झाले. सकाळी जेव्हा काही पर्यटक एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना एटीएम चोरी झाल्याचे समजले यावेळी पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी खुलताबाद पोलीस व बँक अधिका-यांना एटीएम मशीन फोडल्याची माहिती दिली घटनास्थळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, उपनिरीक्षक झलवार तसेच एसबीआय एटीएम मँनेजर विकास निकाळजे, वेरूळ एसबीआय बँकेचे मँनेजर गणेश नवले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली यावेळी श्वानपथक मागविण्यात आले . दरम्यान एसबीआय एटीएम चे मँनेजर विकास निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात एटीएम मशीन फोडून ते लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटे कन्नडच्या दिशेने पळाले
चोरट्यांनी तोंडाला काळा बुरखा बांधन एटीएम मध्ये ३ वाजून ३ मिनिटाला प्रवेश करून अवघ्या दहा मिनिटात एटीएम मशीन छोटा हत्ती गाडीत टाकून कन्नडरोडने जातांना परिसरातील सीसीटीव्ही कँमेरात दिसून आले आहे. पोलीस त्या दिशेने तपासकामी सीसीटीव्ही चेक करत आहे.
वाहन चोरीचे, एटीएम उघडलेच नाही
चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेल वाहन हे वाळूज एमआयडीसीमधून चोरी करून आणले असल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच चोरट्यांनी चोरी करत असतांना एटीएम मशीन जागेवर न उघडता( फोडता) ते तसेच गाडीत टाकून नेले आहे.