भरधाव कारने तिघांना उडविले, १२ वी उत्तीर्ण आदित्यचा दुर्दैवी मृत्यू
By राम शिनगारे | Updated: July 2, 2023 21:34 IST2023-07-02T21:33:52+5:302023-07-02T21:34:12+5:30
आंबेडकर चौकातील घटना : गाडी चालक पोलिसांच्या ताब्यात

भरधाव कारने तिघांना उडविले, १२ वी उत्तीर्ण आदित्यचा दुर्दैवी मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : भरधाव गाडीने सिडकोतील आंबेडकर चौकात सिग्नलवरच तीन युवकांना उडविले. त्यात एका १८ वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
आदित्य अरविंद देहाडे (१८, रा. गौतमनगर, एन-७, सिडको) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला एकजण गाडीने (एमएच २०-जीई ८१५९) सिडको बसस्थानकाकडून रेणुकामाता मंदिराकडे जात होता. आंबेडकर चौकातील सिग्नलवर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याने तीन जणांना उडविले. त्यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश खरात व आदित्य इंगळे (दोघे रा. आंबेडकर) हे दोघे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी सिडको ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचेही सिडको पोलिसांनी स्पष्ट केले.
आदित्य बारावी उत्तीर्ण
आदित्य हा नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याचे वडील ठेकेदार आहेत. ते बांधकामांचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. आदित्यवर रात्री ८ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे देहाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.