कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:18 IST2025-08-30T19:17:52+5:302025-08-30T19:18:32+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सोयगावात कारवाई

कारवाई न केल्याची बक्षिसी म्हणून तीन हजारांची लाच; दोन पोलिस, दोन दलालांना अटक
सोयगाव : निकाली काढण्यात आलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यासाठी बक्षीस म्हणून तीन हजार रुपयांची लाच घेताना सोयगाव ठाण्याच्या दोन पोलिसांसह दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी तीन वाजता सोयगाव शहरातील एका हॉटेलजवळ करण्यात आली. याप्रकरणी चारही आरोपींना अटक केली असून, सोयगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जमादार राजू बर्डे (वय ३६), पोलिस शिपाई रवींद्र रामदास तायडे (३८, पोलिस शिपाई), सुनील मुरलीधर सोनोने (५३, हॉटेलचालक), अरविंद राठोड (२९, होटेलचालक, जरंडी) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, सोयगाव ठाण्यात तक्रारदाराविरोधातील १५ दिवसांपूर्वी आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराविरोधात कोणतीच कारवाई केली नसल्याने बक्षीस म्हणून सोयगाव ठाण्याचे जमादार बर्डे व शिपाई तायडे यांनी जरंडी येथील हॉटेलचालक राठोड याच्यामार्फत १५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने त्यांपैकी पाच हजार २५ ऑगस्ट रोजी फोन पेद्वारे अन्य व्यक्तीला पाठवले होते. त्यानंतर दोन्ही पोलिस हॉटेलचालकांमार्फत उर्वरित १० हजारांची मागणी करीत असल्याची तक्रार गुरुवारी (दि. २८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
विभागाने गुरुवारी दुपारी हॉटेल न्यू मुरलीमध्ये सापळा रचला असता तडजोडीअंती तायडे याने तीन हजार रुपये घेण्याचे कबूल करून मुरली हॉटेलचा मालक सोनोनेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सोनोने याने लाच स्वीकारली. यावेळी तायडे हॉटेलमध्येच हजर होता. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने चौघांनाही अटक करून त्यांच्या ताब्यातील तीन मोबाइल व लाचेची रक्कम, असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगेश शिंदे, सापळा अधिकारी वाल्मिकी कोरे, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे, सी. एन. बागुल, आदींनी केली.