कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आणखी तीन अधिसूचना निघणार: बच्चू कडू

By विकास राऊत | Published: January 16, 2024 07:18 PM2024-01-16T19:18:40+5:302024-01-16T19:23:14+5:30

सगेसोयऱ्यांसह इसमवारी, पाेलिस पाटलांकडील पुराव्यांचा विचार

Three more notifications will be released for Kunbi caste certificate: Bachu Kadu | कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आणखी तीन अधिसूचना निघणार: बच्चू कडू

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आणखी तीन अधिसूचना निघणार: बच्चू कडू

छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी शासन आणखी तीन अधिसूचना काढणार आहे. त्यामुळे सगेसोयऱ्यांच्या संदर्भानुसार त्यांनाही प्रमाणपत्र मिळेल. तसेच भूमी अभिलेखकडील ३३/३४ नुसार असलेली इसमवारी, खातेवारी नमुना, पोलिस पाटील व इतर नोंदीच्या अनुषंगाने प्रमाणपत्र देण्याची पध्दती ठरेल. एक-दोन दिवसांत निघणाऱ्या अधिसूचना मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांना देण्यात येतील. असे आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तत्पूर्वी त्यांनी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची भेट घेऊन सप्टेंबर ते आजवर विभागात तपासलेले पुरावे, आढळलेल्या नोंदी, दिलेले प्रमाणपत्र याचा आढावा घेतला. प्रशासकीय कामाबाबत समाधानी नाही, मात्र नोंदी शोधणे हे काम सोपे देखील नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ तास सचिवांसोबत चर्चा केली. त्याचा मसुदा जरांगे यांच्यासमोर मांडण्यात येईल. त्यात आणखी काही करायचे असेल तर जरांगे सुचवतील. कुणबी नोंदी सापडल्यातर जातीचे दाखले द्यावे लागतील. यावेळी मंगेश चिवटे, उपायुक्त डॉ.अनंत गव्हाणे उपस्थित हाेते.

वंशावळीसाठी वेगळी समिती
मराठवाड्यात कोतवाल बुक नसल्यामुळे नोंदी सापडत नाहीत. तसेच काही पुराव्यांमध्ये एकच नाव दिसत असून आडनाव आढळत नाही. नुसत्या नावासमोर कुणबी लिहिल्याचे आढळत असून त्या आधारे वंशावळ शोधणे अवघड असणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे, असे आ. कडू म्हणाले.

तर अधिकाऱ्यांना आत टाका
नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी नोंदी बोगस असल्याचा आराेप केला आहे. सरकारमधील मंत्री या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात रान पेटवित आहेत, यावर तुमचे मत काय, यावर आ. कडू म्हणाले, मी त्याबाबत काही बोलणार नाही. परंतु नोंदी बाेगस वाटत असतील तर त्यांनी तपासून पाहावे. बोगस असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना आत टाका.

गावोगावी दवंडी देणे सुरू
विभागात प्रत्येक गावात कुणबी नोंदी आढळल्याबाबत व प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी दवंडी देण्यात येत आहे. त्याचे थेट प्रक्षेपण कडू यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. विभागात आजवर सर्व मिळून सुमारे १२ हजार जातप्रमाणपत्रे देण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर १५१३, जालना १७७८, परभणी १८७९, नांदेड ५५, बीड ६३८७, लातूर ११९ तर धाराशिवमध्ये २२९० प्रमाणपत्रे देण्यात आली.

विभागात कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी?
छत्रपती संभाजीनगर.....४४७४
जालना....३३१८
परभणी....२८९१
हिंगोली......३७१३
नांदेड....१७९८
बीड....१३१२८
लातूर.....९०१
धाराशिव....१६०३
एकूण....३१५७६

Web Title: Three more notifications will be released for Kunbi caste certificate: Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.