ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात तीन संचालक अटकेत, बीड कारागृहातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:25 IST2025-01-07T14:20:03+5:302025-01-07T14:25:02+5:30
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनंतर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात तीन संचालक अटकेत, बीड कारागृहातून घेतले ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : करोडोंचा घोटाळा करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या तीन संचालकांना शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी बीड कारागृहातून ताब्यात घेतले. आशिष पद्माकर पाटोदेकर (३२, रा. सोलापूर), यशवंत वसंत कुलकर्णी (५४, रा. बीड), वैभव यशवंत कुलकर्णी (२५, रा. बीड) अशी अटकेतील संचालकांची नावे आहेत.
बीड येथील कुटे ग्रुपवर नोव्हेंबर २०२३ मध्ये प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली. त्यानंतर कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत ठेवी मागण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली आणि पतसंस्था आर्थिक अडचणीत आली. याप्रकरणी राज्यभरात हजारो कोटींच्या फसवणुकीचे ४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. यात पैठणसह छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिस ठाण्यात २३.१५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुटेच्या देशभरातील संपत्तीचा शोध घेऊन त्या जप्त करण्यासाठी पोलिस पत्रव्यवहार करत आहेत.
ऑक्टोबर, २०२४ मध्ये पैठणच्या गुन्ह्यात ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने कुटे व पाटोदेकरला अटक केली होती. त्यानंतर शहर आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्या अटकेसाठी प्रयत्नात होती. निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड यांच्या पथकाने सोमवारी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर त्यांना तिघांचा बीड कारागृहातून ताबा मिळाला. शहरातील पतसंस्थेच्या शाखांमधील व्यवहार, त्यातून कमावलेल्या संपत्तीची माहिती, कुठे उद्योग समुहात गुंतवणूक केलेली रक्कम या मुद्यांवर तीन संचालकांची चौकशी करण्यात येणार आहे.
प्रकृतीचे कारण, कुटेला अटक नाहीच
कुटेच्या अटकेसाठी विविध ठिकाणचे पोलिस तयारीत आहेत. शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बीडमध्ये दाखल झाल्यानंतरही कुटेला अटक करता आली नाही. त्याची प्रकृती खराब असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परिणामी, पोलिसांना अन्य संचालकांना ताब्यात घेऊन शहरात परतावे लागले. कुटेच्या अटकेसाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.