ठेकेदारांना तीन कोटींचा दंड
By Admin | Updated: May 23, 2014 00:20 IST2014-05-23T00:01:44+5:302014-05-23T00:20:41+5:30
उस्मानाबाद : अवैधरित्या वाळूचा उपसा केल्याप्रकरणी परंडा, भूम तालुक्यातील तीन ठेकेदारांना उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी तब्बल तीन कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे़

ठेकेदारांना तीन कोटींचा दंड
उस्मानाबाद : विना परवाना, अवैधरित्या वाळूचा उपसा केल्याप्रकरणी परंडा, भूम तालुक्यातील तीन ठेकेदारांना उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी तब्बल तीन कोटी, दोन लाख, ८४ हजार, ८०० रूपयांचा दंड ठोठावला आहे़ दरम्यान, प्रशासनाने तीन ठेकेदारांवर मोठी कारवाई केल्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहेत़ परंडा तालुक्यातील कौडगाव, बंगाळवाडी, शिराळा, वागेगव्हाण येथील वाळू पट्ट्यांना जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, परंड्याचे तहसीलदार शिवकुमार स्वामी, मंडळ अधिकारी देवकते यांच्यासोबत सात मे रोजी सकाळी भेट देवून पाहणी केली होती़ पाहणीदरम्यान काही ठेकेदार वाळूचा उपसा करताना नियम ढाब्यावर बसवित असल्याचे निदर्शनास आले़ वाळूचा उपसा करण्यासाठी सक्षम पंपाचा वापर करण्याची परवानगी नसतानाही त्याचा वापर सुरू होता़ पंपाद्वारे वाळू उपसा केल्यानंतर पाण्याखालील वाळूचा उपसा होण्याची दाट शक्यता असते़ ही गंभीर बाब लक्षात घेवून पथकाने उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांच्याशी चर्चा केली़ राऊत यांनी याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मागविला होता़ दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या सूचननेनुसार राऊत यांनी संबंधित ठेकेदारांनी उपसलेली वाळू आणि दिलेल्या पावत्या यांची तपासणी केली़ चौकशीदरम्यान तीन ठेकेदारांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार पाणी असताना वाळू उपसा करण्यासाठी शासनाची लागणारी आवश्यक ती परवानगी नसल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे अवैधरित्या वाळू उपसा करणारे ठेकेदार विलास नरहरी उबाळे यांनी शिराळ येथून १४ फेब्रुवारी ते १४ एप्रिल या कालावधीत ६९६ ब्रास वाळू उपसा केल्याप्रकरणी ८९ लाख, ८ हजार ८०० रूपयांचा दंड, दुसरे ठेकेदार सुर्यकांत चंद्रकांत कांबळे (रा़वरूड ता़भूम) याने १३ जानेवारी ते १४ एप्रिल या कालावधीत १३९२ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी १ कोटी, ७८ लाख, १७ हजार, ६०० रूपये तर वांगेगव्हाण (ता़परंडा) येथील ठेकेदार रामराजे पांडुरंग पाटील यांनी २३ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत २७८ ब्रास वाळू उपसा केल्याप्रकरणी ३५ लाख, ५८ हजार, ४०० रूपयांचा दंड गुरूवारी ठोठावला आहे़ (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्यांच्या अचानक तपासणीनंतर प्रशासनाकडून कारवाई. नारनवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली होती अचानक पाहणी. प्रशासनाला आता भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा. जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांचे दणाणले धाबे. पाणी असताना केला होता वाळू उपसा. परवानगीविनाच उपसली वाळू. वाळू उपसा करताना ठेकेदारांकडून नियमबाह्यपणे सक्षम पंपाचा वापर केल्याचेही झाले उघड.