छत्रपती संभाजीनगरातील नवनिर्वाचित नगरसेवकांची ‘विकेट’ घेण्यासाठी विरोधक सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:30 IST2026-01-29T17:30:34+5:302026-01-29T17:30:34+5:30
विरोधकांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, काही तक्रारी मनपा आयुक्तांकडे तर काही प्रकरणे खंडपीठात दाखल होतील.

छत्रपती संभाजीनगरातील नवनिर्वाचित नगरसेवकांची ‘विकेट’ घेण्यासाठी विरोधक सरसावले
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवसच झालेले असताना काही नगरसेवकांना तीन अपत्ये असल्याचे तर कोणी निवडणूक शपथपत्र खोटे दिले, मनपाच्या जागेवर अतिक्रमण, जात प्रमाणपत्र खोटे दिले, असे विविध प्रकार उघडकीस येत आहेत. काही नवनिर्वाचित नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विरोधक सरसावल्याचे चित्र आहे. विरोधकांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, काही तक्रारी मनपा आयुक्तांकडे तर काही प्रकरणे खंडपीठात दाखल होतील. त्यामुळे पुढील काही दिवसांत तीन ते चार प्रभागात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काही राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना कोणतीही चौकशी, शहानिशा केली नाही. आता ते उमेदवार निवडून आले आहेत. मुस्लिमबहुल भागातील काही प्रभागांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांना तीन ते चार अपत्य असल्याचे उघडकीस येत आहे. अपत्यांच्या जन्म प्रमाणपत्रांचे दाखले मिळविण्यास विरोधकांनी सुरुवात केली. अपत्याची तक्रार मनपा आयुक्तांकडे करता येते. त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जातो. त्याचप्रमाणे एका महिला उमेदवाराच्या मुलाने मनपाच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. नियमानुसार या नगरसेविकेचे पद रद्द होऊ शकते. एका उमेदवाराने खोटे शपथपत्र सादर केले. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या एका महिलेचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे विरोधकांचे आरोप आहेत. हा वादही खंडपीठात जाऊ शकतो. आगामी काळात काही नवनिर्वाचितांची विकेट पडणार, हे जवळपास निश्चित आहे. तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल. २०१५ मध्ये काही वाॅर्डात पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.
बहुमताजवळ; पण गुलमंडी गेली...
भाजपचे ५७ सदस्य निवडून आले. बहुमताजवळ पक्ष गेला. पण शहराचे हृदयस्थान असलेला गुलमंडी प्रभाग हातातून गेल्याचे जास्त दु:ख भाजपला आहे. या प्रभागात पोटनिवडणूक लागली तर हे दु:ख दूर करून बहुमताचा आकडा पार करता येईल का, या दृष्टीनेही भाजपने तयारी सुरू केली आहे.
उमेदवार एक प्रमाणपत्र दुसऱ्याला
निवडून आलेल्या सदस्याच्या हातीच निवडणूक निर्णय अधिकारी प्रमाणपत्र देतात. काही प्रभागात उमेदवाराच्या मुलाने, जावयाने, पतीने, सासऱ्याने प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले. एक नगरसेविका तर अंथरुणाला खिळलेली असल्याची चर्चा आता मनपात आहे.
तक्रारींची शहानिशा
निवडणूक विभागाकडे दोन तक्रारी आल्या आहेत. शहानिशा करून वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल. त्यावरून वरिष्ठ निर्णय घेतील.
- विकास नवाळे, उपायुक्त, निवडणूक विभाग