मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 20:01 IST2025-05-03T19:56:29+5:302025-05-03T20:01:12+5:30

अठरा वर्षांची तरुणी बनली देवदूत; साठवण तलावात बुडालेल्या बालकाचा जीव वाचवला

Three boys who came to their uncle's village in summer vacation drowned in a lake; two died, one was saved by a brave young woman | मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

घोसला (छत्रपती संभाजीनगर): बैल धुण्यासाठी गेलेल्या तीन बालकांपैकी दोन मुलांचा साठवण तलावात बुडून मृत्यू झाला असून, एका मुलाचा जीव एका अठरा वर्षीय तरुणीच्या शर्थीमुळे वाचवण्यात यश आले आहे. अकिल शकील पठाण (१८, रा. नांदगाव तांडा) आणि रेहान भिकन शेख (१५, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत. तर वाचलेला मुलगा साकीब कलंदर पठाण (१३, रा. घटनांदरा, ता. सिल्लोड) याच्यावर सध्या पाचोऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या घरी आलेले हे तिघे बालक बैल धुण्यासाठी साठवण तलावाजवळ गेले होते. पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे तिघेही बुडाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलांनी हे लक्षात येताच, मनीषा कैलास बागुल (१८) या धाडसी तरुणीने तलावात उडी घेतली. तब्बल २३ मिनिटे पाण्यात झुंज देत तिने बुडालेल्या साकीब पठाण याला तलावातून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. मात्र, इतर दोघांना वाचवता आले नाही. ग्रामस्थांनी धाव घेत अकिल पठाण व रेहान शेख यांचे मृतदेह बाहेर काढून पाचोऱ्यातील खासगी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. साठवण तलावात धुण्यासाठी पाण्यात उभे असलेले दोन्ही बैल पाण्याबाहेर सुरक्षितपणे बाहेर आले आहेत. दरम्यान, सायंकाळी महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येईल, अशी माहिती नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांनी दिली.

बहाद्दर तरुणीने वाचवला जीव
मनीषा बागुल हिने धाडस दाखवत एकही क्षण न दवडता तलावात उडी घेतली. तब्बल २३ मिनिटे ती पाण्यात झुंज देत होती. शेवटी तिला साकीब पठाण हा बालक मिळाला आणि त्याला तीने पाण्याबाहेर खेचून वाचवले. साकीबवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रसंगानंतर संपूर्ण गावात मनीषा बागुलच्या शौर्याची चर्चा सुरू झाली आहे. धाडसी मनीषाच्या धैर्याला संपूर्ण गावकऱ्यांनी सलाम केला आहे.

Web Title: Three boys who came to their uncle's village in summer vacation drowned in a lake; two died, one was saved by a brave young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.