'सोलार ड्रायर'द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्यातून छत्रपती संभाजीनगरात हजारोंना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:55 IST2024-12-05T19:55:32+5:302024-12-05T19:55:57+5:30

या योजनेची अंमलबजावणी करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ३ वर्षांपासून देशात प्रथम आहे.

Thousands of jobs in Chhatrapati Sambhajinagar through 'solar dryer' industry for drying leafy vegetables, onion | 'सोलार ड्रायर'द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्यातून छत्रपती संभाजीनगरात हजारोंना रोजगार

'सोलार ड्रायर'द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्यातून छत्रपती संभाजीनगरात हजारोंना रोजगार

छत्रपती संभाजीनगर : तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करून नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ३ वर्षांपासून देशात प्रथम आहे. या योजनेमुळे हजारोंना रोजगार उपलब्ध झाला आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेला २०२१-२२ वर्षापासून सुरुवात झाली. तेव्हा एक जिल्हा एक उत्पादन यानुसार अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुदान जाहीर करण्यात आले होते. २०२१-२२ साली जिल्ह्यात १०७ उद्योग उभारून देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला २२२ उद्योगांचे उद्दिष्ट होते. मात्र, जिल्ह्यातील बेरोजगारांनी या योजनेला प्रतिसाद देत तब्बल ७६१ अन्न प्रक्रिया उद्योग उभारून सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६२५ उद्याेगांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ७६६ सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले. यातील ९० टक्के उद्योग ग्रामीण भागात थाटण्यात आले. सोलार ड्रायरमध्ये कांदा, टाेमॅटाे, पालेभाज्या सुकवण्याचा उद्योग करणाऱ्यांची संख्या दीड हजारावर आहे. त्यांचा एका खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. कंपनी त्यांना कच्चा माल देते आणि तयार मालही विकत घेते. यातून या महिलांना ‘ऑफ सिझन’मध्येही रोजगार मिळाल्याचे कृषी विभागाचे उपसंचालक दीपक गवळी यांनी सांगितले.

१० लाखांपर्यंत अनुदान
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना ३५ टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १८४० सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकूण १८४० सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. यात मसाले उद्योग, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, बेकरी उत्पादन, दाल मिल, फळांचा ज्यूस बनवणे, आवळा प्रक्रिया उद्योग, मका प्रक्रिया उद्योग, तेल घाणा, आलू चिप्स बनवणे, सोया प्रॉडक्ट कारखान्यांचा यात समावेश आहे.

Web Title: Thousands of jobs in Chhatrapati Sambhajinagar through 'solar dryer' industry for drying leafy vegetables, onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.