पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:29 IST2025-01-13T18:28:31+5:302025-01-13T18:29:26+5:30

आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू

Those who left the party are traitors; Changes are needed in the party organization for the party to flourish: Ambadas Danave | पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर : युवा सेनेचे पदाधिकारी आता म्हातारे होत आले. गटप्रमुख, शाखाप्रमुख कागदावर आहेत. उपजिल्हाप्रमुख नावालाच असून, पक्ष संघटनेसाठी कोणी वेळच देत नाही. पक्षाला पुन्हा नव्याने उभारी घ्यायची असेल तर बदल हवा. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ज्यांचा पराभव होणार होता, ते निवडून आले. आपण कुठे तरी कमी पडलो. एका पराभवाने काही होत नाही. पुन्हा नव्या जोमाने लढू, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

संत एकनाथ रंगमंदिरात ‘घे भरारी’ या नावाखाली उद्धवसेनेने जिल्हा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात प्रारंभी विधानसभा लढलेले उमेदवार राजू शिंदे, दत्ता गोर्डे, दिनेश परदेशी, बाळासाहेब थोरात यांच्यासह महिला आघाडीच्या आशा दातार यांनी मनोगत व्यक्त केले. दानवे म्हणाले की, ‘रोज बातम्या येतात, हे पक्ष सोडून जाणार, ते सोडून जाणार...एकदा तर मीच जाणार असे छापून आले. यांना प्रत्युत्तर देऊ नका. जे पक्ष सोडून गेले, ते मंत्री होतील, मुख्यमंत्री होतील, पण समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही. राज्यात ईव्हीएमवर रोष आहेच. जे निवडून आले, त्यांनीही स्वत:ला चिमटे घेतले असतील... उद्धवसेनेला ५ लाख २८ हजार मते जिल्ह्यात मिळाली. मविआला ७ लाख ६३ हजार, महायुतीला ८ लाख ५० हजार मते मिळाली. आपण कुठेही कमी पडलो नाही. पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. सचिन तायडे, आनंद तांदूळवाडीकर यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आभार मानले.

आज एका व्यासपीठावर आलो...
चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे एका व्यासपीठावर येत नाहीत, असे म्हटले जाते. आज आम्ही एकत्र आलो ना ? कोणीही खैरे यांचे कान भरतात. माझ्याकडेही असे येतात. कान भरतात, मी या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देताे. आम्हाला बदनाम करू नका. आम्ही एकच आहोत, असे दानवे म्हणताच हशा पिकला.

‘त्या’ नेत्यांवर तोंडसुख
‘माझ्यासोबत सावलीसारखे असणारे सोडून गेले. त्यांना पक्षाने खूप काही दिले. मी शेवटच्या श्वासापर्यंत येथेच राहणार...गटबाजीत पडू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा’, म्हणत चंद्रकांत खैरे यांनी खचाखच भरलेल्या सभागृहाला दंडवत घातले.

Web Title: Those who left the party are traitors; Changes are needed in the party organization for the party to flourish: Ambadas Danave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.