ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच गंडवले; दोन कंपन्यांमध्ये २१ लाखांचा घोटाळा उघड, दोघांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:13 IST2025-02-14T13:08:38+5:302025-02-14T13:13:22+5:30
क्रांती चौक ठाण्यात अनुक्रमे ९ व १२ लाखांच्या घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल

ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच गंडवले; दोन कंपन्यांमध्ये २१ लाखांचा घोटाळा उघड, दोघांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर : ज्यांनी नोकरी दिली, त्यांनाच लाखोंचा गंडा घालत दोन कंपन्यांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पोबारा केला. यात क्रांती चौक पोलिस ठाण्यात सतीश त्र्यंबक त्रिभुवन (रा. भीमशक्ती नगर) व राजेश कांतीलाल जैन (५५, रा. श्रेयनगर) यांच्यावर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
जैन हे सत्यम् पॉलिमेट्स प्रा. लि. या कंपनीत डिसेंबर, २०२२ पासून सेल्स विभागात कामाला होते. ग्राहकांकडून ऑर्डर घेणे, त्यांची थकबाकी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. जैन यांनी कंपनीत रुजू होताच ग्राहकांच्या थकबाकीची रक्कम स्वत:च लंपास करणे सुरू केले. जवळपास वर्षभरात त्यांनी कंपनीचे १२ लाख ७४ हजार रुपये लंपास केले. घोटाळा उघडकीस आल्यावर जैनने कंपनीला व्याजासह परत करण्याचे आश्वासन देऊन संपर्कच बंद केला. अखेर, कंपनीचे व्यवस्थापक नकुल चांडक यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार केली. त्यावरून जैनवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्रिभुवनने ९.७१ लाख लंपास केले
सतीश त्रिभुवन हा जीवनदीप एड्यूमीडिया कंपनीत सेल्स विभागात कामाला होता. ही कंपनी शैक्षणिक पुस्तके, नोटबुक, ऑडिओ व्हिडिओ शैक्षणिक साहित्य विक्री करते. त्रिभुवनकडे शहरासह पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, वाळुज, रांजणगावमधील शाळांची जबाबदारी हाेती. त्यात केवळ धनादेशाद्वारेच बिलाची रक्कम स्वीकारण्याचे आदेश होते. सप्टेंबर, २०२१ मध्ये कंपनीने थकबाकी असलेल्या शाळांना संपर्क केला. तेव्हा त्रिभुवनने त्यांच्याकडून ती वसूल करून स्वत:च्याच बँक खात्यावर घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानेही कंपनीला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते परत न करताच पोबारा केला.