जीवघेण्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई; दोन विक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीची हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:50 IST2025-12-09T13:46:53+5:302025-12-09T13:50:02+5:30
सोशल मीडियावरून मांजाची ऑर्डर, अधिकच्या उत्पन्नासाठी जनरल स्टोअर्स, मोबाईल विक्रेते बनले जीवघेण्या मांजाचे तस्कर

जीवघेण्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई; दोन विक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीची हवा
छत्रपती संभाजीनगर : जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री एका चिमुकल्याच्या जिवावर बेतल्यानंतर याची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या चोवीस तासांत जिन्सीच्या संजयनगरमधून शेख फिरोज हबीब शेख (वय ४२) याला, तर साताऱ्यातून इस्माईल शेख ऊर्फ आदिल हाजी शेख (३२) या दोन विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. ४ डिसेंबर रोजी तीन वर्षीय स्वरांश संजीव जाधव (रा. हर्सूल) हा चिमुकला गळा कापून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करून वीसपेक्षा अधिक टाके देण्यात आले. या घटनेनंतर शहर पोलिस जागे झाले आहेत.
गुन्हे शाखेची तिघांवर कारवाई, दोघांना अटक
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांच्या पथकाने विक्रेत्यांचा शोध सुरू केला. यात संजयनगरच्या रिजवाना बेगम निसार शेख (वय ४५) व शेख फिरोज हबीब शेख (४२) यांच्या घरात छापा , तर साताऱ्यात शेख इस्माईल याच्या दुकानात छापा मारत त्याला ताब्यात घेतले. फिरोजकडून ५१, तर इस्माईलकडून ४ गट्टू जप्त करण्यात आले. न्यायालयाने फिरोजला १ दिवसांची, तर इस्माईलला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अधिकाऱ्यांकडे तपास, गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश
सोमवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सर्व पोलिस ठाणे प्रभारी, गुन्हे शाखेला नायलाॅन मांजाबाबत कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले. शिवाय, विक्रेत्यांना अटक करावी, न्यायालयात सखोल तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. अंमलदाराऐवजी पोलिस उपनिरीक्षक व त्यावरील अधिकाऱ्यांकडे गुन्ह्याचा तपास द्यावा व गुन्हे शाखेने त्या आरोपीची चौकशी करून तस्करीबाबत धागेदारे मिळवावे, अशा सूचना केल्या. सोमवारी जवळपास २५ पतंग विक्रेत्यांची पोलिस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली.
सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर बीएनएस ११० , २२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ कलम ५ अन्वये गुन्हा दाखल होईल. नायलॉन मांजाचा वापर, विक्री होत असल्यास नागरिकांनी पुढे यावे. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. ११२, ०२४०-२२४०५०० या क्रमांकासह पोलिस आयुक्तांचा व्हॉट्सॲप क्रमांक ९२२६५१४००१ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.