मराठवाड्यातील साडेसहा लाख नागरिकांची तहान टँकरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:41 IST2020-06-09T19:38:36+5:302020-06-09T19:41:48+5:30
जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत.

मराठवाड्यातील साडेसहा लाख नागरिकांची तहान टँकरवर
औरंगाबाद : पावसाळा सुरू झाला असला तरी मराठवाडा विभागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विभागात सध्या ३६५ टँकर सुरू असून, ६ लाख ५९ हजार १९२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. औरंगाबाद जिल्ह्याला टंचाईच्या सध्या सर्वाधिक झळा बसत आहेत.
जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच विभागात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. १ जूनपासून आजवर विभागात ५ टक्के पाऊस झाला आहे. असे असले तरी मराठवाड्यातील टँकरची संख्या अजून कमी झालेली नाही. या महिन्यात टँकरची संख्या कमी होईल, असा अंदाज नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. मागील वर्षीच मराठवाड्यात चार हजार टँकर सुरू होते. ती भीषणता यंदा नसली तरी पावसाळा लागला तरी विभागात टँकर सुरूच आहेत.
मराठवाड्यातील टंचाईची जिल्हानिहाय स्थिती
जिल्हा टँकर अवलंबून लोकसंख्या
औरंगाबाद १४५ ३ लाख २६ हजार ३२५
जालना ४९ ८४ हजार ६१५
परभणी ०१ २ हजार ५००
हिंगोली ०० ००
नांदेड २० २३ हजार ३३३
बीड १३१ १ लाख ९६ हजार ३५६
लातूर ०३ ४ हजार ३८२
उस्मानाबाद १६ २१ हजार ६८१
एकूण ३६५ ६ लाख ५९ हजार १९२