औरंगाबादहून ८ तासांत हडपसर, मराठवाड्यात प्रथमच नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला थर्ड एसी इकोनाॅमीक्लास बोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 12:04 IST2022-01-03T11:58:21+5:302022-01-03T12:04:32+5:30
Nanded-Hadapsar Express: नांदेड-पुणे या द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत आणि रेल्वेस्थानकात (टर्मिनल) आणि रचनेत बदल करण्यास काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने मान्यता दिली.

औरंगाबादहून ८ तासांत हडपसर, मराठवाड्यात प्रथमच नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला थर्ड एसी इकोनाॅमीक्लास बोगी
औरंगाबाद : नांदेड-पुणे द्वि साप्ताहिक एक्स्प्रेसचे ( Nanded-Hadapsar Express ) रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये करण्यात आले आहे. एलएचबी कोचेस लावण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातून ( Marathwada ) धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदाच थर्ड एसी इकाेनाॅमी क्लास बोगी देण्यात आली आहे. या बोगीमुळे नियमित थर्ड एसी बोगीच्या तुलनेत अगदी कमी पैशांत वातानुकूलित प्रवास करता येणार आहे.
नांदेड-पुणे या द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत आणि रेल्वेस्थानकात (टर्मिनल) आणि रचनेत बदल करण्यास काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. ही रेल्वे पुणे स्थानकाऐवजी आता हडपसर रेल्वेस्थानकापर्यंत धावेल आणि हडपसरवरूनच सुटेल. या रेल्वेला २० बोगी राहणार आहेत. या सर्व बोगी या एलएचबी बोगी आहेत. त्यामुळे हडपसरपर्यंतचा प्रवास आरामदायक होण्यास मदत होईल. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेत प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवासात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याबरोबर रेल्वेत जीपीएस प्रणाली असून, प्रत्येक बोगीत स्पीकरची व्यवस्था आहे. त्यातून रेल्वे नेमकी कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती प्रवाशांना मिळेल.
औरंगाबादहून ८ तासांत हडपसर (Aurangabad to Hadapsar in 8 hours)
ही रेल्वे नांदेडहून रविवारी, मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबादला रात्री १०.२० वाजता दाखल होईल. रात्री १०.२५ वाजता पुढे रवाना होईल आणि हडपसर येथे सकाळी ६.५५ वाजता पोहोचेल.