शस्त्र, रॉडसह मास्क घालून फिरणारे चोरटे छत्रपती संभाजीनगरात सक्रिय, तीन दिवसांत चार घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:25 IST2025-09-06T12:20:57+5:302025-09-06T12:25:02+5:30

अपार्टमेंटमधील अन्य फ्लॅटचे दरवाजे बाहेरून लावून घेत रेकी, शहर हद्दीलगत देवळाई, खडी रोड परिसरात वाढला वावर

Thieves wearing masks, carrying weapons and rods, are active in Chhatrapati Sambhajinagar, four incidents in three days | शस्त्र, रॉडसह मास्क घालून फिरणारे चोरटे छत्रपती संभाजीनगरात सक्रिय, तीन दिवसांत चार घटना

शस्त्र, रॉडसह मास्क घालून फिरणारे चोरटे छत्रपती संभाजीनगरात सक्रिय, तीन दिवसांत चार घटना

छत्रपती संभाजीनगर : गेल्या १५ दिवसांपासून तोंड झाकून फिरणाऱ्या शस्त्रधारी चोरांच्या टोळ्या शहरात रात्रभर चोरी, लुटमारी करत फिरत आहेत. प्रामुख्याने पिसादेवी, बीड बायपास, पडेगावसह वाळूज परिसरात यांचा वावर आढळला आहे. तीन दिवसांत दुकान फोडीसह घरफोडीच्या चार घटना उघडकीस आल्या असून सण, उत्सवात या टोळ्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

देवळाई परिसरात कारमधून आलेल्या चोरांनी मोठ्या टॉमीने दुकानाचे शटर उचकटवून तब्बल ४ लाख रुपयांचा सुकामेवा चोरून नेला. ही घटना ताजी असतानाच पडेगाव-मिटमिटा परिसरातील तारांगण कासलीवाल सोसायटीमधील ओमसाई प्रोव्हिजन दुकान चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री २:३० वाजता फोडण्याचा प्रयत्न केला. महेश बालकिसन पंचारिया यांचे ओमसाई प्रोव्हिजन नावाने किराणा दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. बुधवारी रात्री १०:३० वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. सकाळी ७ वाजता मात्र दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. चोरांनी मोठ्या पकडने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतील बाजूनेही कुलूप असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. महिनाभरापूर्वी देखील याच परिसरातील सराफा व्यावसायिकाचे दुकान फोडले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधील सायरन वाजल्याने चोर पळून गेले. तिसऱ्या घटनेत पोलिस आयुक्तालयात कार्यरत एका पोलिस अंमलदाराचे घर फोडत लाखोंचा ऐवज लंपास झाला होता.

एकच पद्धत, एकच देहबोली
बीड बायपास, पडेगावसह पिसादेवी परिसरात झालेल्या घरफोडीत चोरांच्या हातातील टॉमी, गणवेश, रेनकोट परिधान करण्याची पद्धत एकच आहे. शिवाय, देवळाई, म्हस्के पेट्रोलपंप परिसरातील घटनांसह पडेगावमध्ये देखील चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते.

पिसादेवीतही किराणा दुकान लक्ष्य
अनिल चव्हाण यांचे पिसादेवी परिसरातील श्रीकृष्ण रेसिडेन्सीमध्ये किराणा दुकान आहे. २ सप्टेंबर रोजी रात्रीतून दुकानाचे शटर उचकटून चोर आत घुसले. यात दीड लाख रुपयांचे किराणा सामान व इलेक्ट्रिक साहित्य चोरांनी लंपास केले.

बीड बायपासवर अपार्टमेंटमध्ये रेकी
गेल्या दहा दिवसांत देवळाई, खडी रोड, माऊलीनगरसह म्हस्के पेट्रोलपंप परिसरात चोरांचा वावर वाढला आहे. रात्री १ वाजेनंतर अपार्टमेंटमध्ये हातात शस्त्रांसह घुसून घरफोडीसाठी रेकी करत फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

Web Title: Thieves wearing masks, carrying weapons and rods, are active in Chhatrapati Sambhajinagar, four incidents in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.