गोडाऊनची भिंत फोडून चोरट्यांनी ३१० टायर केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 19:10 IST2019-11-22T19:08:23+5:302019-11-22T19:10:11+5:30
चोरट्यांनी गोडाऊनच्या भिंतीला छिद्र पाडून ही चोरी केल्याचे त्यांना दिसले.

गोडाऊनची भिंत फोडून चोरट्यांनी ३१० टायर केले लंपास
औरंगाबाद: मोठ्या कंपनीचे पुरवठादार असलेल्या एजन्सीचे वळदगाव शिवारातील गोडाऊन फोडून चोरट्यांनी तब्बल ३१० टायर चोरून नेल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याविषयी चोरट्यांविरोधात सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सातारा पोलिसांनी सांगितले की, हर्सूल परिसरातील सवेरा पार्क येथील रहिवासी मीनहाज अहेमद शकील अहेमद यांच्या मालकीची वळदगाव शिवारातील गट नंबर १३४ मध्ये पुष्पक सी अॅण्ड एफ एजन्सी(कॅरि अॅण्ड फॉरवर्ड) आहे. या एजन्सीमार्फत एमआयडीसीतील कंपन्यांना ते टायरचा पुरवठा करतात. एजन्सीच्या कार्यालयालगतच टायरचे गोडाऊन आहे. त्यांचे हे गोडाऊन सांभाळण्यासाठी सुरक्षारक्षक असतो. १९ रोजी सुरक्षा रक्षक सुटीवर गेला होता. २० रोजी दिवसभर तक्रारदार मीनहाज यांनी व्यवसाय केला आणि रात्री ते एजन्सी आणि गोडाऊन बंद करून घरी गेले. सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्री गोडाऊनच्या मागील भिंतीला मोठे छिद्र पाडून आत प्रवेश केला. गोडाऊनमधील सुमारे २ लाख ९४ हजार ८९४ रुपये किमतीचे ३१० टायर चोरून नेले. याचवेळी एजन्सीच्या कार्यालयातील ड्रावर उचकटून त्यातील किमती चोरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी २१ रोजी ८ वाजता एजन्सीमालक हे नेहमीप्रमाणे तेथे गेले तेव्हा त्यांना एजन्सी आणि गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचे दिसले. चोरट्यांनी गोडाऊनच्या भिंतीला छिद्र पाडून ही चोरी केल्याचे त्यांना दिसले.
या घटनेची माहिती त्यांनी तात्काळी सातारा पोलीस ठाण्याला कळविली. पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे आणि गुन्हेशाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंचनामा करून सातारा पोलिसांनी मिनहाज यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला.