औरंगाबाद : सिडको एन २ मधील ठाकरेनगरातील २ महिन्यांपासून बंद असलेले घर चोरट्यांनी फोडल्याची घटना २६ मे रोजी उघडकीस आली. चोरट्यांनी घरातून लॅपटॉप, एल.ई. डी. टीव्ही आणि ३५ हजाराची रोकड लंपास केली.
सिडको एन २ मधील ठाकरेनगर येथील रहिवासी प्रमोद नारायण खरात (४७) हे दोन महिन्यांपासून परिवारासह गावाला गेले होते. २१ मे रोजी त्यांनी त्यांचे घर सुरक्षित असल्याची खात्री केली होती. त्यानंतर कधी तरी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून, कपाट उचकटून त्यातील रोख ३५ हजार रुपये, लॅपटाॅप आणि एलईडी टीव्ही चोरून नेला. २६ मे रोजी ते औरंगाबादला परतले, तेव्हा त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक शरद इंगळे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अंगुलीमुद्रा तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्रमोद खरात यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदगुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यात संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले दिसले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.