नातेवाईकांच्या भेटीस गेलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:23 IST2020-11-24T13:21:33+5:302020-11-24T13:23:42+5:30
मुथियान रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्रमांक २ मध्ये विशाल सुखलाल सोखिया हे सहकुटुंब राहतात.

नातेवाईकांच्या भेटीस गेलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज पळविला
औरंगाबाद : शहरातील दीपनगर येथील मुथियान अपार्टमेंटमधील रहिवासी व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी २ लाखांची रोकड आणि २२ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना २३ रोजी दुपारी उघडकीस आली.
मुथियान रेसिडेन्सी येथील फ्लॅट क्रमांक २ मध्ये विशाल सुखलाल सोखिया हे सहकुटुंब राहतात. दिवाळीसाठी त्यांना गावी जाता आले नव्हते. यामुळेच सोखिया कुटुंब २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घराला कुलूप लावून कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे सासुरवाडीला गेले होते. २३ रोजी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास ते चिकलठाण येथून औरंगाबादला परतले. तेव्हा त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता कपाट उघडे दिसले आणि त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटाची किल्ली तेथेच ठेवलेल्या असल्याने चोरट्यांनी सहजपणे या किल्लीने कपाट उघडून त्यातील रोख २ लाख रुपये आणि २२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आली. घटना कळताच सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे, उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्वान ३०० मीटरवर जाऊन घुटमळले
पोलिसांनी श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. तेव्हा श्वान हा सोखिया यांच्या अपार्टमेंटपासून ३०० मीटरपर्यंत जाऊन घुटमळला. यावरून चोरटे तेथून वाहनाने पसार झाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे.