चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:33 IST2025-04-28T18:32:07+5:302025-04-28T18:33:35+5:30

राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, शिंदेसेनेचे खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

There will definitely be a discussion! Photos of Congress MPs on hoardings welcoming Shinde Sena ministers | चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

चर्चा होणारच! शिंदेसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागत होर्डिंग्जवर कॉँग्रेस खासदारांचा फोटो

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले हे गेल्या आठवड्यात शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले हाेते. त्यांच्या उपस्थितीत फुलंब्री आणि पैठण तालुक्यांत अनेक कार्यक्रम होते. परंतु, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक कार्यक्रम झाले नाहीत. मात्र, त्या कार्यक्रमासाठी लावलेल्या होर्डिंग्जची चर्चा आजही गावभर सुरू आहे. राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजकीय होर्डिंग्जची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. 

औरंगाबाद-जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड-सोयगाव, पैठण, फुलंब्री हे तालुके आहेत. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला. भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा दणक्यात पराभव झाला. या तिन्ही मतदारसंघांत महायुतीला फटका बसला. भाजपचे उमेदवार दानवे यांना २ लाख २३ हजार ३०५ तर काँग्रेसचे उमेदवार खा. कल्याण काळे यांना ३ लाख ९ हजार ८७६ मते मिळाली. ८६ हजार ५७१ मत काँग्रेसला जास्तीची मिळाली.

विशेष म्हणजे महायुतीचे आ. अब्दुल सत्तार, फुलंब्रीचे तत्कालीन आमदार व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह पैठणमध्ये महायुतीचे मोठे नेटवर्क असताना दानवे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. पराभवानंतर दानवे यांनी सत्तार यांच्यावर जोरदार आरोप केले. तसेच पैठणमध्ये खा. संदीपान भुमरे यांच्या फळीनेदेखील काम न केल्याचे आरोप सुरू झाले. हा सगळा राजकीय प्रपंच पाहता, काँग्रेस आणि भाजपमध्ये त्या लोकसभा मतदारसंघात राजकीय धुमश्चक्री असताना शिंदेसेनेचे मंत्री गोगावले यांच्या स्वागत होर्डिंग्जवर काँग्रेस खासदारांचा फोटो ठळकपणे लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले चर्चा करतात...
राजकारणात नव्याने आलेले व अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशा चर्चा करतात. मी ते होर्डिंग्ज लावलेच नाहीत. परंतु, पैठण तालुक्यातील कार्यक्रमांचा मी प्रमुख अतिथी हाेतो. मी कार्यक्रमांना गेलोही होतो.
- कल्याण काळे, खासदार

ते खासदार आहेत, मान ठेवावा लागेल...
रोहयोला केंद्राचा निधी असतो. खासदार म्हणून काळे यांना बोलावले होते. पैठण तालुका काळे यांच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांना मान देणे गरजेचे आहे. त्यामुळे बिनबुडाच्या चर्चांना वाव नाही.
- संदीपान भुमरे, खासदार

Web Title: There will definitely be a discussion! Photos of Congress MPs on hoardings welcoming Shinde Sena ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.