मालमत्ता करावर कोणत्याही प्रकारची व्याज माफी मिळणार नाही! मनपा प्रशासनाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:14 IST2025-01-30T13:14:00+5:302025-01-30T13:14:24+5:30
मालमत्ता करावर मनपाकडून २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येते.

मालमत्ता करावर कोणत्याही प्रकारची व्याज माफी मिळणार नाही! मनपा प्रशासनाची भूमिका
छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता करावर कोणत्याही प्रकारची व्याज माफी देण्यात येणार नाही. व्यावसायिक आणि निवासी मालमत्ताधारकांकडून थकबाकी, चालू आर्थिक वर्षाची वसुली करण्यात येणार असल्याची भूमिका बुधवारी महापालिका प्रशासनाने मांडली. मागील तीन वर्षांपासून प्रशासनाने मालमत्ता करावर व्याज माफी देण्याची योजना आणली नाही. व्याज माफी द्यावी, अशी मालमत्ताधारकांची मागणी होती.
शहरात २ लाख ८२ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. दरवर्षी ३० ते ३५ टक्केच मालमत्ताधारक नियमित कर भरतात. दरवर्षी कराची थकबाकी वाढतच चालली आहे. यंदा मनपा प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या माध्यमाने ५०० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. १ लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यामुळे मालमत्ताधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
४,८८२ जणांना नोटिसा
महापालिकेने आतापर्यंत ८ हजार २५३ जणांना नोटिसा पाठविण्याची तयारी केली. त्यातील ४ हजार ८८२ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या. उर्वरित नोटिसा या आठवड्यात वितरित केल्या जाणार आहेत. ५३३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. त्यांच्याकडून ७ कोटी ५३ लाख रुपये कर भरण्यात आला.
प्रशासकांचे कडक शब्दात आदेश
मनपाने लोकअदालतीमार्फत नोटिसा दिल्या. नोटीस घेऊन नागरिक वॉर्ड कार्यालयात जात आहेत. तेथील कर्मचारी त्यांना ‘लोकअदालतीमध्ये जा’ असे सांगून मोकळे होत आहेत. वॉर्ड कार्यालयांनी असे अजिबात करू नये. नागरिकांची तोंडी, लेखी तक्रार असल्यास तेथेच स्वीकारावी. तक्रारीचे जागेवरच निरसन करावे. नागरिकांना लोकअदालतीमध्ये पाठवू नये, अशा शब्दात प्रशासकांनी वॉर्ड कार्यालयांना आदेशित केले.
चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात
मालमत्ता करावर मनपाकडून २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करण्यात येते. यापूर्वी ७५ टक्के व्याज माफीची योजना मनपाने आणली. यंदाही व्याज माफीची योजना आणावी, अशी आग्रही मागणी शिंदे सेनेने केली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ पालकमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. पालकमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.