कोरोना अनुदानात शहर- ग्रामीण भेद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 16:04 IST2020-10-10T16:04:13+5:302020-10-10T16:04:48+5:30
कोरोनाविरूद्धचे युद्ध अजून संपलेले नाही. औषध, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा पुरवठा सध्या बऱ्यापैकी असून ग्रामीण आणि शहरी असा भेद कोरोना नियंत्रण अनुदान वाटपात नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.

कोरोना अनुदानात शहर- ग्रामीण भेद नाही
औरंगाबाद : कोरोनाविरूद्धचे युद्ध अजून संपलेले नाही. औषध, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा पुरवठा सध्या बऱ्यापैकी असून ग्रामीण आणि शहरी असा भेद कोरोना नियंत्रण अनुदान वाटपात नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले.
कुठलाही रूग्ण असला तरी तो शहरात येत आहे. शेजारील जिल्ह्यांतील रूग्णदेखील औरंगाबादमध्ये येत आहेत. ३० टक्के रूग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे कुणालाही रूग्णसेवा नाकारता येत नाही. या भावनेतून कोरोना उपाय योजनांसाठी मतभेद न करता निधी कमी पडणार नाही, असे प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कोरोना उपाय योजनांसाठी ५३ कोटी ७० लाख रूपयांच्या निधीपैकी ४४ कोटी ४२ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता आहे. आजवर १५ कोटी ९५ लाख रूपये निधी वितरित केल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनस्थळे आणि मंदिरांबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मुंबईत बैठक घेतील आणि निर्णय जाहीर करतील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.