संधीचा गैरफायदा नाही, उलट सोनेच केले; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:49 IST2025-08-18T19:47:54+5:302025-08-18T19:49:54+5:30
आयुष्यात खोटे बोलायचे नाही, हे पक्के ठरविले. चूक झाली तर प्रांजळपणे मान्य करायचे.

संधीचा गैरफायदा नाही, उलट सोनेच केले; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : मला जे काम सांगितले ते प्रामाणिकपणे करत गेलो. कोणी करत नसलेली कामेही करीत होतो. जेव्हा संधी मिळाली, तिचा कधीच गैरफायदा घेतला नाही. उलट त्या संधीचे सोने कसे करता येईल, असे काम केले, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले. एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात बागडे यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, अब्दुल सत्तार यांच्यासह संत, महंत संप्रदायातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी वैदिक मंत्रोच्चारात बागडे यांचे सप्त चिरंजीव पूजन करण्यात आले. बागडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ दिवे लावून सुहासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. नाणेतुला उपस्थित संत-महंतांच्या हस्ते करण्यात आली. बागडे म्हणाले की, आयुष्यात खोटे बोलायचे नाही, हे पक्के ठरविले. चूक झाली तर प्रांजळपणे मान्य करायचे. वैयक्तिक मी कोणालाच त्रास दिला नाही. २०२४ मध्ये निवडणूक लढवायची नाही हे दीड वर्षांपूर्वी घोषित केले होते. शेती, दूध संघ, कारखाना, शाळेकडे लक्ष द्यायचे ठरले. २७ जुलै २०२४ रोजी अचानक पंतप्रधानांचा फोन आला. त्यांनी मला महाराष्ट्राबाहेर नेण्याचे संकेत दिले. रात्री उशिरा राजस्थानच्या राज्यपालपदी घोषणा झाल्याचे बागडे म्हणाले.
कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन
सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीला टोपी, उपरणे, संत, महंत यांचा सन्मान, प्रत्येकाला बोलण्याची संधी असे शिस्तीत कार्यक्रमाचे नियोजन केले होते. रामूकाका शेळके, रमेशअण्णा मुळे, राधाकिसन पठाडे, सजनराव मते, जावेद पटेल, सुदाम ठोंबरे, सुहास शिरसाट, संजय खंबायते, दामूअण्णा नवपुते आदींनी परिश्रम घेतले.
नाना यांना उपराष्ट्रपती करा
रामराव महाराज ढोक यांनी नानांची (बागडे) स्तुती केली. नानांचे दात शाबूत आहेत, कारण त्यांनी कोणावर दात खाल्ला नाही. उपराष्ट्रपतिपदावर नानांची वर्णी लागावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळकृष्ण महाराज गिरगावकर यांनी वारकरी संप्रदायातील एकाला आमदार करण्याची विनंती बागडे यांना केली.