'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:15 IST2025-11-17T16:08:36+5:302025-11-17T16:15:41+5:30
विरोधकांची पालिका निवडणुकीत माती होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला दावा

'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान
छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जेथे-जेथे शक्य आहे, त्याठिकाणी महायुती करायची आहे. पण, एवढे मात्र लक्षात ठेवायचे की, एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही, तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष असतील, विरोधक नसतील. हे लक्षात ठेवूनच लढायचे आहे. असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या स्थानिक नेत्यांचे कान टोचले.
चिकलठाणा विमानतळासमोरील भाजपच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बाेलत होते. नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेच्या मग महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या सगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून भाजप नंबर एकचा पक्ष असेल, पालिका निवडणुकीत विरोधकांची माती होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
फडणवीस म्हणाले, काँग्रेससह विरोधी पक्ष जमिनीवर नसून जनतेत जात नसल्याने त्यांची अशीच माती होत राहील. कधी मतचोरीचा मुद्दा, कधी ईव्हीएमचा मुद्दा आणतात. पण ज्यावेळी कोर्ट त्यांना पुरावा मागते, इलेक्शन कमिशन पुरावा मागते. तेव्हा एक पुरावा देखील देऊ शकत नाहीत, नुसता हवेत गोळीबार करतात. असेच वागत राहिले, तर महाराष्ट्रातल्याही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची माती होईल. हे माझे भाकित आहे.
शहर पाणीपुरवठा योजनेत ठाकरे सरकारच्या काळात अडचणी आल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले. मात्र, गावांमध्ये गेल्यानंतर माणसेच नसायचे. अंबादास दानवे माणसे कुठे गेले हे विचारत होते. लोकांना तुमच्यावर विश्वास नसल्यामुळे ते तुमच्याकडे येणार नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.
ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी कार्यालय बांधणीचा प्रवास सांगितला. खा. डॉ. भागवत कराड, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. रावसाहेब दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. अनुराधा चव्हाण, केंद्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, आ. संजय केणेकर, नारायण कुचे, सुरेश धस, बबनराव लोणीकर, प्रशांत बंब, संजय कौडगे, खा. अनिल गोपछडे, अनिल मकरिये, श्रीनिवास देव, किशोर शितोळे, शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती.
हे शहर इंडस्ट्रियल मॅग्नेट होणार....
हे शहर इंडस्ट्रियल मॅग्नेट होत असून, किर्लोस्कर, टोयोटा, जेएसडब्ल्यूसह हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आलीय, हजारो हातांना काम देखील मिळेल. देशातील इलेक्ट्रिक व्हेईकलचे कॅपिटल हे शहर असणार आहे. समृद्धी महामार्गामुळे आज चित्र बदलत आहे. एअरपोर्टला ७४० कोटी रुपये मंजूर केले असून, प्रमुख इंटरनॅशनल एअरपोर्ट होईल. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर मार्ग, मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला.
सावे यांनी घेतले परिश्रम....
मंत्री अतुल सावे यांनी सुसज्ज कार्यालय उभारणीत खुप परिश्रम घेतले. जमीन शोधण्यापासून इमारत उभी राहीपर्यंत सातत्याने अडचणींचा सामना त्यांनी केला. सरकारी जमिनी घ्यायची नाही, अनधिकृत बांधकाम करायचे नाही. शंभर टक्के परवानग्या घेऊनच भाजपचे कार्यालय तयार झाले पाहिजे. या भूमिकेवर ते खरे उतरल्याचे फडणवीस म्हणाले. अनिल मकरिये यांनी २ वर्षे कार्यालय बांधणीसाठी वेळ दिल्याने त्यांचाही सत्कार फडणवीस यांनी केला.
कार्यालयातून जनतेच्या समस्या सोडवा....
पदाधिकाऱ्यांच्या कॅबिन्स, प्रदेश कार्यकारणीसाठी मुख्य बैठक हॉलसह दोन मोठे हॉल आहेत. बोर्ड रूम, वॉर रूम, डायनिंग हॉल आहे. मात्र, कार्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पक्षाचे काम नसते, त्या कार्यालयातून लोकाभिमुखता काय आणणार, कार्यकर्त्यांना कसा आधार देणार, तेथून जनतेच्या किती समस्या सुटतील, यावर पक्षाचा विस्तार असतो. पदाधिकाऱ्यांसह जे प्रमुख आहेत, त्यांची ही जबाबदारी असेल. असे फडणवीस म्हणाले.