छत्रपती संभाजीनगरात भटकी कुत्री ७० हजार, निवारागृहांमध्ये किती ठेवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:38 IST2025-12-10T19:37:52+5:302025-12-10T19:38:10+5:30
निवारागृहांची संख्या नगण्य असून, पकडलेल्या कुत्र्यांकरिता शासकीय व्यवस्थाच नाही.

छत्रपती संभाजीनगरात भटकी कुत्री ७० हजार, निवारागृहांमध्ये किती ठेवणार?
छत्रपती संभाजीनगर : शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ७० हजारांपर्यंत असल्याने त्यांच्याकडून नागरिकांना चावणे, हल्ले करणे, रस्ते अपघात यासारख्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. अशातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्याचे नगरविकास विभागाने सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि निवारागृहात ठेवण्याबाबत तातडीचे निर्देश जारी केले आहेत.
निवारागृहांची संख्या नगण्य असून, पकडलेल्या कुत्र्यांकरिता शासकीय व्यवस्थाच नाही. मनपाने फक्त खासगी संस्थांना नसबंदीचे काम दिले आहे; परंतु जखमी, आक्रमक किंवा चावा घेणाऱ्या कुत्र्यांसाठीच्या व्यवस्थेचा अभाव आहे.
भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यास आता दंड
सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानुसार मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देणे गुन्हा ठरेल. अशा व्यक्तींवर मनपा दंडात्मक कारवाई करणार आहे. उघड्यावर पडलेल्या खाद्यपदार्थांमुळे कुत्रे एका ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होत असून, त्यामुळे चावा आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.
सुप्रीम कोर्टाचा आदेश:
भटक्या कुत्र्यांचा प्रभावी बंदोबस्त, निर्बीजीकरण, लसीकरण अनिवार्य.
‘फीडिंग’ केल्यास दंड
सार्वजनिक जागेत खायला देणाऱ्यांवर दंड.
निर्बीजीकरण व लसीकरण
१००% निर्बीजीकरणावर भर; रेबीज विरोधी लसीकरण अनिवार्य.
पकडून निवारागृहात ठेवणे
मनपांनी सुरक्षायुक्त, मानकांनुसार निवारा उभारणे आवश्यक.
शहरात सुमारे ७०,००० कुत्रे- निवारागृह कुठे?
शहरात उपलब्ध जागा आणि क्षमता अपुरी आहे.
अँटिरेबीज औषधसाठा
मनपा रुग्णालयांना पुरेसा इंजेक्शन साठा ठेवण्याचे निर्देश.
श्वान तक्रार हेल्पलाइन
नागरिकांसाठी स्वतंत्र फोन नंबर व तक्रार नोंद सुविधा.
कामात कुचराई झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश.
कामकाजाचे वास्तव चित्र:
आदेश आहेत; पण सुविधा नाहीत
मनपाकडे स्वतंत्र डॉग शेल्टर नाही, नसबंदीचे काम संथ गतीने
चावण्याचे प्रमाण वाढते आहे. तातडीच्या पकड मोहिमा अपुऱ्या
नागरिकांकडून तक्रारी वाढत आहेत.
एक वर्षात चावा
वर्ष २०२४-२५ वर्षात चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या २,३५० आहे.
(स्रोत : मनपा आरोग्य विभाग)
प्राणिमित्र संघटना म्हणते...
कुत्र्यांना खायला देणे गुन्हा ठरवणे हा उपाय नाही. शहरात शासकीय निवारागृह नसणे हीच सर्वांत मोठी समस्या आहे.
- जयेश शिंदे, प्राणिमित्र संघटना
काम अंतिम टप्प्यात
नसबंदी जलद करण्यासाठी अतिरिक्त कंत्राट प्रक्रिया सुरू केली आहे. निवारागृहासाठी जागा शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
- मनपा पशुवैद्यकीय अधिकारी, शेख शाहेद