बिडकीनच्या तरुणांची कमाल! पोलिसांच्या कामाचे टेन्शन कमी करणारे 'कॉपमॅप' ॲप विकसित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:33 IST2025-12-08T12:27:54+5:302025-12-08T12:33:43+5:30
छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीनच्या तरुणांनी सुरू केलेल्या 'मेक इन इंडिया' स्टार्टअपला केंद्र सरकारचे १० लाखांचे अनुदान

बिडकीनच्या तरुणांची कमाल! पोलिसांच्या कामाचे टेन्शन कमी करणारे 'कॉपमॅप' ॲप विकसित
छत्रपती संभाजीनगर: बिडकीनसारख्या एका छोट्या गावातील तरुणांनी आपल्या बुद्धीच्या बळावर थेट देशाच्या पोलीस दलाचे काम सुलभ करण्यासाठी एक आगळेवेगळे पाऊल टाकले आहे. हरीश वाघ आणि त्याचा मित्र यश अहिरराव या दोन तरुण अभियंत्यांनी पोलिसांसाठी 'कॉपमॅप' नावाचे मोबाइल ॲप्लिकेशन बनवले आहे. त्यांच्या या स्टार्टअपने राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन केंद्र सरकारच्या 'जेनेसीस ईआयएआर प्रोग्रॅम' अंतर्गत १० लाख रुपयांचे अनुदान मिळवले आहे.
'ॲप'चा जन्म, पोलिसांच्या अडचणींवर उपाय
बिडकीन येथील हरीश वाघ आणि यश अहिरराव यांनी धुळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्राची पदवी घेतली आहे. महाविद्यालयात असतानाच त्यांनी पोलिसांच्या दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणींवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्यास सुरुवात केली. याच प्रयत्नातून 'आयक्युलिटिक्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि.' ही त्यांची स्टार्टअप कंपनी आणि 'कॉपमॅप' ॲप्लिकेशनची कल्पना साकारली.
हरीशने ॲपची उपयुक्तता स्पष्ट करताना सांगितले:
"पोलिस अंमलदारांपासून ते पोलिस अधीक्षकापर्यंत सर्वांना उपयुक्त असे हे ॲप्लिकेशन आहे. पोलीस अंमलदार त्यांच्या मोबाइलवरून वरिष्ठांना 'अलर्ट'ही देऊ शकतात." कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी कर्मचारी हजर आहेत की नाही, याची अचूक माहिती वरिष्ठांना कळेल. तसेच, ठाणेप्रमुख कर्मचाऱ्यांचे ड्युटी चार्ट या ॲपमधून त्यांना कळवू शकतील.
राष्ट्रीय स्तरावर निवड, १० लाखांचे अनुदान
हरीश आणि यश यांच्या या नवकल्पनेला केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान दिला आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 'ईआयआर' योजनेतून 'मॅजिक' संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या स्टार्टअप्सला १० लाख रुपये अनुदानासाठी निवडले गेले. देशभरातील १०० हून अधिक स्टार्टअप्समधून 'कॉपमॅप'ची निवड झाली आहे. यामुळे त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन, इन्क्युबेशन सुविधा आणि भारतातील वेगाने वाढणाऱ्या डीप-टेक स्टार्टअप परिसंस्थेशी जोडण्याची मोठी संधी मिळणार आहे.
कोपरगावचा 'गुरू' ॲपही पात्र
याचबरोबर, कोपरगाव (अहिल्यानगर) येथील ब्रेनस्पायर्ड लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेला 'गुरू' हा एआय आधारित प्लॅटफॉर्म देखील अनुदानासाठी पात्र ठरला आहे. मानसिक आरोग्य उपचारांसाठी मोठी क्रांती घडवणारे हे तंत्रज्ञान नैराश्य, चिंता आणि संयोग विकारांवर प्रभावी ठरणार आहे.