दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:10 IST2025-08-06T14:10:26+5:302025-08-06T14:10:59+5:30
२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, फसवणुकीच्या रकमेतून एफडी केली, सोने घेतले, पोलिसांकडून अटक

दुबईचा उद्योजक सांगून शेतकऱ्याला ५० लाखांना गंडवणारा ठग निघाला बारावी पास
छत्रपती संभाजीनगर : दुबईत विविध कंपन्या असून देशात उद्योग वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील शेतकऱ्याची फसवणूक करणारा अवघा बारावीपर्यंत शिकलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सिडको पोलिसांनी याप्रकरणात सापळा लावून अनिल गोविंदा शिंदे (रा. पाचोरा, जि. जळगाव) यास अटक करत फसवणुकीच्या रकमेतील २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रभान बापूराव वटाणे (७२, रा. बजाजनगर) यांची २०२१-२२ मध्ये अनिलसोबत आळंदीत ओळख झाली होती. तेव्हा अनिल याने त्याच्या दुबईत कंपन्या असून ५ लाख दिले, तर १५ लाख रुपये देतो, अशी थाप मारली. वटाणे यांचे मित्र गौतम पाईकराव (रा. हातेडी, परतूर) यांची पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या समर्थ फार्मर नावाने कंपनीसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे वटाणे यांनी पाईकराव व शिंदेची भेट घडवली. त्याच्यावर विश्वास ठेवत वटाणे, पाईकराव यांनी नातेवाइकांकडून पैसे जमवून दीड कोटी रुपये मिळण्याच्या अपेक्षेने शिंदेला ५० लाख रुपये दिले होते.
१८ मार्च, २०२५ रोजी सकाळी ५० लाख रोख रक्कम हातात पडताच शिंदे शहरातून पसार झाला. सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या सूचनेवरुन सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी त्याचा शोध सुरू केला. फसवणुकीच्या बहाण्याने तो रविवारी शहरात येत असल्याची माहिती प्राप्त होताच सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, दीपक देशमुख, विशाल सोनावणे यांनी सिडको परिसरात सापळा रचून अटक केली.
म्हणे दुबईत उद्योजक, निघाला बारावी पास
स्वत:च्या दुबईत कंपन्या असल्याचे, कोट्यवधी रुपयांची गुंतवणुकीच्या थापा मारणारा शिंदे केवळ बारावी उत्तीर्ण निघाला. विशेष म्हणजे, कंपनीची बनावट कागदपत्रे, आयटी रिटर्नच्या प्रती देखील दाखवल्या. ५०० रुपयांचे दोन कोरे बॉण्डही दिले. पैसे मिळाल्यानंतर सोशल मीडियावर नोटांच्या बंडलचे स्टेटसही ठेवले. ५० लाखांतून त्याने २ सोन्याच्या अंगठ्या, दीड लाखांचा मोबाईल खरेदी केला. १० लाखांची एफडी केली. या ऐवजासह त्याच्या ताब्यातून १० लाख रोख जप्त करण्यात आले. उर्वरित रोख रकमेसह त्याने आणखी कोणाला फसवलेय का, याचा तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.