लोकमत महामॅरेथॉनचा थरार; छत्रपती संभाजीनगरकर करणार धावण्याचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:16 IST2024-12-12T13:16:04+5:302024-12-12T13:16:48+5:30
लोकमत महामॅरेथॉनचा थरार; धावण्यासाठी हजारो धावपटू झाले आतुर

लोकमत महामॅरेथॉनचा थरार; छत्रपती संभाजीनगरकर करणार धावण्याचा विक्रम
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आरोग्य आणि अभिमानाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘लोकमत महामॅरेथॉन’ १५ डिसेंबर रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे रंगणार आहे. यंदा महामॅरेथॉनचे हे आठवे पर्व असून, प्रत्येक पर्वागणिक सहभागी धावपटूंचा सहभागी होण्याचा ग्राफ उंचावत आहे. त्यामुळे यंदाही हा ग्राफ आणखी उंचावणार असून, लोकमत महामॅरेथॉनमध्ये छत्रपती संभाजीनगरकर धावण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
बालगोपाळांपासून वृद्ध आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा चैतन्यपूर्ण सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ही वैशिष्ट्ये असणारी महामॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी. आणि २१ कि.मी. अंतरात होत आहे. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिके असणारी ही महामॅरेथॉन यंदा सखी मंच, कॅम्पस क्लबसाठी आकर्षण ठरणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये नागरिकांना कुटुंबासोबत धावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचा श्रीगणेशा करणाऱ्यांसाठीदेखील ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरणार आहे. याचे कारण म्हणजे ज्यांना धावण्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ३ व ५ कि.मी. हे अंतर असणार आहे. १२ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ५ कि.मी. अंतराच्या ‘फन रन’चा यात समावेश आहे. तसेच प्रोफेशनल धावपटूंसाठी २१ कि.मी. अंतर असणार आहे.
महामॅरेथॉनमध्ये एक मोठा उत्सव
ज्यांना व्यायामाकडे वळायचे आहे ते १ जानेवारीचा मुहूर्त पाहत असतात. त्यांच्यासाठी महामॅरेथॉन एक पर्वणी आहे. ते लोकमत महामॅरेथॉनमध्ये ३ कि.मी.त सहभागी होऊ शकतात. पूर्ण कुटुंबासह या महामॅरेथॉनमध्ये धावता येत असल्याने हा एक मोठा उत्सव बनला आहे. त्याचप्रमाणे महामॅरेथॉनमध्ये जे मेडल मिळते ते तुम्हाला व्यायाम करण्यासाठी प्रेरित करते.
- नितीन घोरपडे
आयर्नमॅन व क्रीडा संचालक, एमजीएम
‘लोकमत समूहा’ने महामॅरेथॉनचे आयोजन करून धावपटूंना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. लोकमत महामॅरेथॉनचे आयोजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असते. या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील धावपटू आतुर असतात. आता लोकमत समूहाने बोस्टन, न्यू यॉर्क यासारख्या जगातील अव्वल मॅरेथॉनच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करावी.
- दयानंद कांबळे
आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स पंच
शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी लोकमत समूह महामॅरेथॉनच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवत आहे. ७ वर्षांपासून ॲडव्हान्स फिजियोज हब हे महामॅरेथॉनमध्ये फिजियो पार्टनर आहे. आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून धावण्यासाठी धावपटूंना मदत करतो. महामॅरेथॉनमध्ये मॅन्युअल थेरेपी, फूट, असिसमेंट असे उपक्रम आम्ही राबवत असतो.
- प्रशांत पारधे, फिजियो