छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित; कारणे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:35 IST2025-09-25T12:34:31+5:302025-09-25T12:35:31+5:30
तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त सोनकवडे यांच्याबाबतची अनेक प्रकरणे समोर आली होती.

छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे अखेर निलंबित; कारणे गंभीर
छत्रपती संभाजीनगर : मर्जीतील ठेकेदारांना वसतिगृहाचा भोजन ठेका देणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित ठेवणे, मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव तांत्रिक अडचण दाखवून अडवून ठेवणे, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर जातीयवादाचे आरोप आणि वसतिगृहात नियुक्त महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून घरगड्यासारखे राबवून घेतल्याप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त आणि जिल्हा जातपडताळणी समितीच्या विद्यमान उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांना अखेर निलंबित केले. विभागाचे सहसचिव सो. ना. बागल यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी निलंबनाचे आदेश जारी केले.
तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त सोनकवडे यांच्याबाबतची अनेक प्रकरणे समोर आली होती. सोनकवडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचे प्रस्ताव तांत्रिक अडचण दाखवून अडवून ठेवले होते. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहातील प्रवेशितांकरिता मर्जीतील भोजन पुरवठादाराची नियुक्ती केली, बाह्यस्रोत यंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या घरातील खासगी कामे करवून घेऊन त्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. अधिकारी व कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ प्रलंबित ठेवले तसेच ते विलंबाने अदा केले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या विरूध्द छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलिस ठाणे येथे एका गुन्हा नोंदविण्यात आला होता. हे प्रकरण तपासावर आहे.
या गैरवर्तणूकीमुळे त्यांनी कर्तव्याचे पालन करण्यात कसूर करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९च्या नियम ३चा भंग केला. त्यानुसार तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत जयश्री सोनकवडे यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन कालावधीत खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, जयश्री सोनकवडे या सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे कार्यरत आहेत.
राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीने निलंबन
८ महिन्यांपासून सोनकवडे विरुद्ध राजकीय व प्रशासकीय असे द्वंद्व सुरू होते. मॅटमध्ये माझे बदली प्रकरण आहे, त्याचा निकाल निकाल येण्यापूर्वीच माझे निलंबन केले. यामागे राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती असल्याचा संशय आहे, असे सोनकवडे यांनी व्यक्त केला.