छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरीत होणार; बंजारा समाजाची सहमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:47 IST2025-07-15T14:44:58+5:302025-07-15T14:47:12+5:30
बंजारा समाजाने सामाजिक भान राखून आणि शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्याच्या भावनेने महानगरपालिकेची मागणी मान्य केली.

छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक यांचा पुतळा स्थलांतरीत होणार; बंजारा समाजाची सहमती
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानक परिसरातील वसंतराव नाईक चौकात महापालिकेने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारला होता. हा पुतळा रस्ता रुंदीकरणात बाधित होत आहे. पुतळा स्थलांतरीत करण्यासाठी सोमवारी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने प्रशासक जी. श्रीकांत यांना सहमती दिली.
महानगरपालिकेने पुतळ्याची जागा उपलब्ध करून देण्याबाबत बंजारा समाजाला विनंती केली होती. बंजारा समाजाने सामाजिक भान राखून आणि शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्याच्या भावनेने महानगरपालिकेची मागणी मान्य केली. याबद्दल प्रशासक जी. श्रीकांत यांनी बंजारा समाजाचे आभार मानले आणि या समाजाने दाखवलेल्या सहकार्याचे विशेष कौतुक केले. माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या नेतृत्त्वाखाली बंजारा समाजाच्या एका शिष्टमंडळाने प्रशासकांची भेट घेतली. शिष्टमंडळाने रस्ता रुंदीकरणासाठी जागा देण्यास सहमती दर्शवली. या निर्णयामुळे रुंदीकरणाच्या कामाला गती मिळणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी नमूद केले की, बंजारा समाजाने शहराच्या हितासाठी घेतलेला निर्णय अत्यंत सकारात्मक आहे. विकासाच्या प्रक्रियेत समाजाने दाखवलेली सहकार्याची भावना ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या भावनेचा मनापासून सन्मान करतो. वसंतराव नाईक यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली होती. त्या दृष्टीने वसंतराव नाईक चौकातच नवीन पुतळ्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. वर्तमानातील पुतळ्याच्या समोरच्या जागेत चौथरा व इतर संरचनात्मक कामे अंतिम टप्प्यात असून, दोन महिन्यात काम पूर्णत्त्वास जाईल. नंतर पुतळा समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन ठिकाणी पुतळा उभारण्यात येईल, अशी माहिती प्रशासकांनी दिली.
या शिष्टमंडळात गंगाधर राठोड, राजेंद्र राठोड, रमेश पवार, राजपालसिंग राठोड, डॉ. कृष्णा राठोड, प्रा. पृथ्वीराज पवार, राजू राठोड, विनोद जाधव, एकनाथ चव्हाण, संदीप राठोड, राठोड पंडित आणि फुलसिंग जाधव यांचा समावेश होता.