दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 19:56 IST2025-04-29T19:55:16+5:302025-04-29T19:56:11+5:30

मनपाचे कडक धोरण, लवकरच छत्रपती संभाजीनगरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू होणार

The properties of those who print hoardings without permission in Chhatrapati Sambhaji Nagar will be sealed. | दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील

दणका! छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय होर्डिंग छापणाऱ्यांच्या मालमत्ता होणार सील

छत्रपती संभाजीनगर : होर्डिंगची छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्सवरच आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मनपाच्या परवानगीशिवाय होर्डिंग छपाई केल्यास प्रिंटर्सची मालमत्ता सील केली जाईल. मोठा दंडही आकारला जाणार असल्याची माहिती सोमवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. लवकरच शहरात अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शहरात एका कार्यक्रमात शहर विद्रुपीकरणावर बोट ठेवले. त्यानंतर सोमवारी महापालिकेत विविध राजकीय पक्षांची होर्डिंगसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. अनधिकृत होर्डिंगसंदर्भात जनहित याचिका दाखल करणाऱ्या सविता कुलकर्णी, भारती भांडेकर यांच्यासह बीएसपीचे राहुल साळवे, सचिन महापुरे यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.

राजकीय पक्षांची बैठकीकडे पाठ
शहरातील सर्वच लहानमोठ्या राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मनपाने सोमवारी बैठकीसाठी बोलावले होते. सर्वच राजकीय पक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

याचिकाकर्त्यांची भूमिका आक्रमक
कुलकर्णी, भांडेकर यांनी बैठकीत अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडली. शहरात अनधिकृत होर्डिंग लागू नये यासाठी प्रशासनाने जे काही करता येईल, ते करावे. शहर सुंदर, स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. प्रशासनाने ती पार पाडावी असेही सांगितले. मनपाचे अधिकारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिस निव्वळ चकरा मारायला लावतात, अशी व्यथा मनपा अधिकाऱ्यांंनी बैठकीत मांडली.

कारवाई सुरू करा
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, कारवाई सुरू करा. पथदिव्यांवर एकही बॅनर लागणार नाही, याची काळजी घ्या. महामानवांचे पोस्टर्स लावलेले असतील तर ते काळजीपूर्वक काढा. नेत्यांचे होर्डिंग ठेवू नका. झेंडा पडला कोणाच्या भावना दुखावल्या तर दंगलसुद्धा भडकू शकते. अनधिकृत फ्लेक्स छापून देणाऱ्यांवर कारवाई हाेईल. त्यांच्या मालमत्ताच सील केल्या जातील. हे काम सोपे नाही. मात्र, आम्ही करणारच.

शहरात ६० पेक्षा अधिक प्रिंटर
कॅनाॅट, रेल्वे स्टेशन रोड, शहानूरमियाँ दर्गा परिसर, बजरंग चौक, टीव्ही सेंटर, सिडको बसस्थानक इ. भागांत अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग छापून देणारे प्रिंटर आहेत. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल या क्षेत्रात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पर्यावरणासाठीही फ्लेक्स, होर्डिंग धोकादायक आहेत.

असे आहेत, होर्डिंगचे दर
८ बाय ३, ४ बाय १० लोखंडी ॲंगलसह एक होर्डिंग दोन हजार ते पंधराशेपर्यंत तयार करून दिले जाते. अधिक पैसे दिले तर लावूनही दिले जाते. २ बाय ४ या आकाराचे होर्डिंग शहरातील प्रत्येक पथदिव्याला लटकलेले असतात. हे तर अवघ्या १०० ते १५० रुपयांमध्ये तयार करून दिले जाते. याची संख्या जास्त असेल तर ५० ते ६० रुपयांपर्यंतही छपाई करून मिळते.

Web Title: The properties of those who print hoardings without permission in Chhatrapati Sambhaji Nagar will be sealed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.