कोथिंबीर जुडीचा भाव पाचोडात ५० पैसे तर छ. संभाजीनगरात २० रुपये, शेतकऱ्यांच्या हाती किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:53 IST2025-09-02T11:45:30+5:302025-09-02T11:53:44+5:30
पाचोडच्या आठवडी बाजारात शेतमालास मातीमोल भाव : संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर फेकली कोथिंबीर

कोथिंबीर जुडीचा भाव पाचोडात ५० पैसे तर छ. संभाजीनगरात २० रुपये, शेतकऱ्यांच्या हाती किती?
पाचोड/छत्रपती संभाजीनगर : पाचोडच्या रविवार आठवडी बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीला ५० पैसे ते १ रुपयांचा दर मिळत असल्याने केकत जळगाव येथील संतप्त शेतकऱ्याने रस्त्यावर सर्व कोथिंबीर फेकल्याची घटना सकाळी नऊ वाजता घडली. तोच छत्रपती संभाजीनगरातील आठवडी बाजारात कोथिंबिरीची लहान जुडी १०, तर मोठी जुडी तब्बल २० रुपयाला विकली जात होती.
केकत जळगावचे गणेश अजिनाथ थोरे यांना नऊ एकर शेती आहे. खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांना चांगला भाव मिळत नसल्यामुळे यंदा भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात एका एकरावर कोथिंबीरची लावगड केली. मेहनत, मशागत, पाणी, खते वापरून कोथिंबीर पिकविली. वाहतुकीचा मोठा खर्च करून कोथिंबीर पाचोडच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आणली; मात्र बाजारात कोथिंबिरीला केवळ ५० ते १०० रुपये प्रतिशेकडा असा तोकडा दर व्यापारी देऊ करीत होते.
परिणामी, एक जुडी केवळ ५० पैसे ते १ रुपया दराने विकावी लागणार होती. या दरात विक्री केल्यास उत्पादन खर्च तर सोडाच, मजुरी व वाहतुकीचा खर्चही निघत नाही, असा संताप व्यक्त करीत गणेश थोरे यांनी आपल्या गाठोड्यातून कोथिंबीर काढून रस्त्यावर फेकून दिली आणि रिकाम्या हाताने घराकडे परतले.
शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
या घटनेमुळे बाजार परिसरात आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. ‘शेतात अतोनात मेहनत करूनही पिकाला भाव मिळत नसेल, तर शेती कशी टिकेल ?’ असा सवाल अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. उत्पादन खर्च वाढत असतानाही बाजारभाव मात्र दरवर्षी घसरतच आहे. शासनाने भाजीपाला उत्पादकांसाठी किंमत हमी योजना राबवावी, अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.
नाशिकहून भाजीपाला येतो
सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाला खराब झाला आहे. पाचोडला तीच कोथिंबीर बाजारात आल्याने त्याला भाव मिळाला नाही. शहरात नगर, नाशिकहून भाजीपाला येतो. आम्हाला मोठी जुडी १० रुपयाला मिळते. ती किरकोळामध्ये २० रुपयाला जाते.
- संजय वाघमारे, शहरातील भाजी विक्रेता