टपाल खात्याची ऐतिहासिक सेवा “रजिस्टर्ड पोस्ट” आता इतिहासजमा ! स्पीड पोस्ट हाच पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:12 IST2025-09-02T12:11:25+5:302025-09-02T12:12:15+5:30
ब्रिटिश काळात सुरू झालेल्या या सेवेने अनेक दशकं भारतीयांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली.

टपाल खात्याची ऐतिहासिक सेवा “रजिस्टर्ड पोस्ट” आता इतिहासजमा ! स्पीड पोस्ट हाच पर्याय
छत्रपती संभाजीनगर : भारतीय टपाल खात्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय १ सप्टेंबरपासून औपचारिकरीत्या संपुष्टात आला आहे. “नोंदणीकृत पत्र” सर्वसामान्य नागरिकांसाठी विश्वासार्ह, औपचारिक महत्त्वाचे दस्तऐवज होते. १ सप्टेंबर २०२५ पासून अधिकृतरीत्या ही सेवा बंद करण्यात आली आहे. तर आता यानंतर या सेवेचे सर्व फायदे आता थेट स्पीड पोस्टच्या माध्यमातूनच होतील.
१५० वर्षांची परंपरा इतिहासजमा
ब्रिटिश काळात सुरू झालेल्या या सेवेने अनेक दशकं भारतीयांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत, कोर्टाची नोटीस, सरकारी नोकरीची ऑफर, परीक्षा निकाल, लग्नाची बोलणी किंवा दूरच्या नातलगांचा भावपूर्ण संदेश आदींचे वाहक नोंदणीकृत पत्रच असायचे. पोस्टमन जेव्हा ते पत्र हातात घेऊन दाराशी उभा राहायचा, तेव्हा घराघरात उत्सुकता आणि थोडी भीती दाटून यायची.
खर्च वाढला, स्वरूप बदललं
आतापर्यंत नोंदणीकृत पत्रासाठी २२ रुपये व ४ रुपये जीएसटी म्हणजे एकूण २६ रुपये आकारले जात होते. पोहोच पावती लावली तर ३० रुपये लागायचे. तर स्पीड पोस्टची किंमत ३६ रुपये व ५ रुपये जीएसटी म्हणजे ४१ रुपये असून, पोहोच पावतीसह ती ५१ रुपयांपर्यंत पोहोचते. आता टपाल खात्याने हे सर्व पर्याय स्पीड पोस्टमध्येच एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘संवेदना’ हरवली?
टपाल खात्याच्या मते, हा बदल ग्राहकांसाठी सोयीचा आहे. कारण सर्व सुविधा ट्रॅकिंग, पोहोच पावती, कायदेशीर वैधता आदी एकाच सेवेच्या माध्यमातून मिळणार आहेत. मात्र, ज्यांनी नोंदणीकृत पत्राच्या माध्यमातून पत्र व्यवहार केले आहेत त्यांच्यासाठी हा बदल म्हणजे एक भावनिक धक्का आहे. नोंदणीकृत पत्र हे केवळ दस्तऐवज नव्हते, तर एक महत्त्वाची घटना होती. पोस्टमन ते हातात देताना ज्या गंभीरतेने पाहायचा, ती नजर आता हरवणार आहे. ‘स्पीड’ मिळेल, मात्र ती स्मृती कायम राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्मृतींचा ठेवा
जुन्या मराठी सिनेमांपासून वास्तव जीवनातील असंख्य आठवणीपर्यंत, नोंदणीकृत पत्राने कित्येक कथानकांची सुरुवात करवली. “रजिस्टर्ड पोस्ट” हा शब्दच कायदेशीर सामर्थ्य असलेला आणि औपचारिकतेचे प्रतीक ठरला होता.