भरधाव कंटेनरने पाठीमागून दुचाकीस उडवले; पती-पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 19:35 IST2024-01-29T19:34:44+5:302024-01-29T19:35:14+5:30
पतीचा जागीच तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

भरधाव कंटेनरने पाठीमागून दुचाकीस उडवले; पती-पत्नीचा मृत्यू
सिल्लोड: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज दुपारी २ वाजता भरधाव कंटेनरने दुचाकीवरील पतीपत्नीस उडवले. यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मौलाना सैयद अजीम रब्बानी ( ३४), आयशा सैयद अजीम ( ३०, देवलगाव बाजार) अशी मृतांची नावे आहेत.
सिल्लोडहून दाम्पत्य दुचाकीवरून (एम एच २० डी. यु.९४०७ ) देऊळगाव बाजारकडे जात होते. तर कंटेनर (एम एच ४५ यु २१७५ ) हा छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव कडे जात होता. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. यात मौलाना सैयद अजीम रब्बानी हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी आयशा सैयद ही गंभीर जखमी झाल्या. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस निरीक्षक शेषराव उदार, बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.