विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन
By बापू सोळुंके | Updated: July 25, 2024 19:31 IST2024-07-25T19:31:13+5:302024-07-25T19:31:50+5:30
सत्ताधाऱ्यांसह विरोधकही आमचे नाहीत, त्यामुळे आम्ही विधानसभेत उमेदवार देणार: मनोज जरांगे

विधानसभेसाठी काही उमेदवारांची नावे फायनल झाली; मनोज जरांगेंनी सांगितला पुढचा प्लॅन
छत्रपती संभाजीनगर: आंदोलक म्हणून मी आशावादी असल्याने सरकारने मागणी केल्यामुळे पुन्हा एक महिना वेळ दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सत्ताधारीही आमचे नाहीत आणि विरोधक आमचे नाहीत. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार देणार असल्याचे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (२५)येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ७ ते १३ ऑगस्टदरम्यान पुन्हा ‘जनसंवाद यात्रा’ काढणार आहे. यासाठी सर्व मराठा समाज लेकरा बाळासह रस्त्यावर यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या पाचव्या दिवशी समस्त मराठा समाजाच्या आग्रहाखातर जरांगे यांनी त्यांचे उपोषण थांबविले. उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने बुधवारी ते शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. गुरूवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, रक्तातील साखर कमी झाली आणि रक्तदाबही कमी झाला होता. गोरगरीब लोकांना फडणवीस यांच्या टेबलाजवळ बसून उत्तर द्यायचे आहे, त्याचीच आता तयारी सुरू केली आहे. रात्री काही उमेदवारांची नावे फायनल केल्याचे ते म्हणाले. १९ ऑगस्ट ला मराठा समाजाचे बैठक बोलावून सगळं जाहीर करणार, आमची बाजू मांडणारा जो कुणी असेल त्यांना निवडून आणणार असल्याचे ते म्हणाले. मागच्या दाराने आलेले आ. दरेकर, आ. लाड पत्रकार परिषद घेऊन टीका करत आहेत. त्यांना उत्तर देणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.
सरकारचे आवाहन असल्याने उपोषण स्थगित
सरकारने थेट आपल्याला आवाहन केले नसले, तरी प्रसिद्धी माध्यमातून मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन महिने मागितले होते, म्हणून मी त्यांना वेळ दिल्याचे पाटील यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. सलाईन घेऊन पडून राहण्यापेक्षा निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे. यामुळे उपोषण मागे घेतल्याचे ते म्हणाले. आता सत्ताधारी आणि विरोधक आमचे नसल्याने थेट गोरगरीब लोकांना मैदानात उतरावं लागेल,असा इशारा त्यांनी दिला.
७ ते १३ ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात दुसरा टप्पा
७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत जनसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात होईल. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ही जनसंवाद यात्रा काढली जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. या कालावधीत मोठा पाऊस असला तरी समाजाने रस्त्यावर यावे,असे आवाहन त्यांनी केले.