नाव ‘चिमण्या’ पण कामगिरी दमदार; शंकरपटाचा हिंद केसरीचा मानकरी अन् किंमत ६४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:52 IST2025-06-13T19:52:03+5:302025-06-13T19:52:27+5:30

‘चिमण्या’ बैलास अंडी, बदाम, १० लिटर दूधाचा खुराक; किंमत तब्बल ६४ लाख; पुण्याच्या शौकिनाची फुलंब्रीतील तळेगाव वाडीच्या शेतकऱ्याकडून खरेदी

The name is 'Chimanya' but the performance is strong; Shankarpat's Hind Kesari is the winner and the price is 64 lakhs | नाव ‘चिमण्या’ पण कामगिरी दमदार; शंकरपटाचा हिंद केसरीचा मानकरी अन् किंमत ६४ लाख

नाव ‘चिमण्या’ पण कामगिरी दमदार; शंकरपटाचा हिंद केसरीचा मानकरी अन् किंमत ६४ लाख

- रऊफ शेख
फुलंब्री :
तालुक्यातील तळेगाव वाडी येथील चिमण्या बैलाची तब्बल ६४ लाख रुपयांत विक्री झाली आहे. बैलगाडा मालक नवाब खाँ यांच्या एका बैलासाठी पुण्याच्या अमित भाडळे या शौकीन व्यक्तीने ही किंमत मोजली आहे. पुण्यातील कासेगावमध्ये झालेल्या शंकरपट स्पर्धेत चिमण्या हिंद केसरीचा मानकरी ठरला होता. याशिवाय, १७ स्पर्धांत त्याने प्रथम पारितोषिक मिळवून दिले आहे.

हौसेला मोल नाही, असे आपण नेहमीच म्हणतो. याची प्रचिती तळेगाव वाडीतील शंकरपटाच्या एका बैलासाठी पुण्याच्या शौकिनाने मोजलेल्या किमतीवरून येते. जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या बैलगाडा मालकाला एका बैलासाठी ६४ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. तळेगाव वाडी येथील नवाब खाँ मजीद खाँ हे मागील काही वर्षांपासून शंकर पट स्पर्धेत सहभागी होतात. त्यांच्याकडे दोन वर्षांपासून चिमण्या नावाचा बैल आहे. त्याने राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील बैलगाडा शर्यतींमध्ये भाग घेत आतापर्यंत १७ प्रथम, तर ६ द्वितीय पुरस्कार पटकावले आहेत. चिमण्याची ख्याती महाराष्ट्रभर पसरलेली असून, पुणे येथील कासेगावातील शंकरपटात दिला जाणारा मानाचा हिंद केसरी पुरस्कारही त्याने पटकावला आहे.

दररोजचे खाद्य अंडी, बदाम, १० लिटर दूध
याबाबत चिमण्याचे मालक नवाब खाँ मजीद खाँ म्हणाले, आमच्याकडे शंकर पटाचे तीन बैल आहेत. त्यापैकी एक चिमण्या बैल विकला. त्याला ६४ लाख रुपये किंमत मिळाली. चार वर्षांपासून त्यांना दररोज १० लिटर दूध, अंडे, बदाम, उडीद डाळ, शाळू ज्वारीचा कडबा, हिरवा चारा असा आहार देत होतो. या खाद्यामुळे तो तंदुरुस्त आहे. शंकरपटाच्या अनेक शर्यती जिंकून दिल्याचे ते म्हणाले.

‘राजा-सम्राट’साठी एक कोटीची बोली
नवाब खाँ यांच्याकडे आणखी एक बैलजोडी आहे. राजा-सम्राट अशी त्यांची नावे आहेत. या जोडीने गेल्या एका वर्षभरात सहा ठिकाणच्या सहा शंकरपट शर्यतींमध्ये प्रथम पुरस्कार पटकावले. या जोडीसाठी एका हौशी व्यक्तीने एक कोटी रुपयांची बोली लागलेली आहे; पण नवाब खान यांनाही शंकरपटाचा छंद असल्याने राजा-सम्राट विकण्यास नकार दिला.

नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत
शंकरपट शर्यतीची आवड असल्याने हौसेपोटी चिमण्या बैलासाठी ६४ लाख रुपयांची किंमत मोजली. आठ दिवसांपूर्वीच चिमण्याचे मालक नवाब खाँ यांच्याकडून त्याला घेतले, असे पुण्यातील खरेदीदार अमित भाडळे यांनी सांगितले.

Web Title: The name is 'Chimanya' but the performance is strong; Shankarpat's Hind Kesari is the winner and the price is 64 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.