विभागीय क्रीडा संकुलाचा कोट्यवधीचा घोटाळा; मुलासह क्षीरसागर कुटुंबाचाच नियोजित कटच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 19:29 IST2025-01-03T19:24:54+5:302025-01-03T19:29:00+5:30
भांडाफोड होण्याची कुणकुण लागताच नाशिकमधून तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज, सर्वांचा विदेशात पळून जाण्याचा होता कट

विभागीय क्रीडा संकुलाचा कोट्यवधीचा घोटाळा; मुलासह क्षीरसागर कुटुंबाचाच नियोजित कटच
छत्रपती संभाजीनगर: विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीत घोटाळा करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरला कोट्यवधींचा निधी लंपास करणे सहज सोपे वाटले. हा प्रकार कोणाला कळणार नाही याच भ्रमात त्याचे आई-वडीलही राहिले आणि पुढे कुटुंबाने सुनियोजित कट रचून सहा महिन्यांत २१.५९ कोटींचा निधी लंपास केला. मुलगा चुकतोय, हे माहीत असतानाही पैसे, उच्चभ्रू राहणीमानाच्या लालसेतून आई-वडिलांसह सख्ख्या मामानेही त्याला घोटाळ्यासाठी मूकसंमतीच दिल्याचे समोर येत आहे.
मंगळवारी हर्षकुमारचे आई-वडील अनिल व मनीषाला कर्नाटकमधील मुर्डेश्वर येथून अटक केली, तर हर्षकुमारला दिल्ली येथून अटक केली. उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाने दोघांसह हर्षकुमारचा मामा हितेश आनंदा शार्दूल (३५, मालेगाव कँप, नाशिक) याला देखील बुधवारी अटक केली. तिघांना गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर तिघांना देखील ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सलग दुसऱ्या दिवशी सरकारी पक्ष, आरोपी वकिलांमध्ये तासभर खडाजंगी
- सरकारी पक्षातर्फे ॲड. रवींद्र अवसरमल तर हर्षकुमार व कुटुंबीयांच्या वतीने ॲड. रामेश्वर तोतला यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
- बुधवारी हर्षकुमारच्या अटकेसंदर्भात झालेली दोन्ही पक्षांच्या वकिलांमधील खडाजंगी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी देखील पाहायला मिळाली.
- पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजता मनीषा, अनिलला अटक केली. न्यायालयात मात्र गुरुवारी हजर केल्याचा दावा करत तोतला यांनी पोलिसांनी कायदाच मोडल्याचा मुद्दा मांडत पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
- जवळपास तासभर चाललेल्या या खडाजंगीनंतर न्यायालयाने पोलिसांना अटकेसंदर्भातील सर्व कागदपत्र, नोटीस सादर करण्याचे आदेश दिले.
- पोलिसांनी मुर्डेश्वर येथील स्थानिक ठाण्यात पत्र देऊन ताब्यात घेतल्याचे, अटकेचे सर्व कागदपत्र सादर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी पक्षाची कारवाई व न्यायालयीन कोठडीची मागणी फेटाळून लावली.
आईसह मामाच्या खात्यातही लाखो रुपये
ऑक्टोबर महिन्यात हर्षकुमारने आईच्या बँक खात्यात ४७ लाख, मालेगावमध्ये सुतार काम करणाऱ्या मामाच्या खात्यावर २२ लाख रुपये पाठवले. शहर सोडल्यानंतर पुढे कसे पळून जायचे, कायदेशीर सल्लामसलत कशी करायची, त्याचे नियोजन देखील मामाच्या शेवटच्या भेटीत झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.
आई-वडिलांच्या पासपोर्टसाठी प्रयत्न
साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोट्यवधी रुपये हडप केल्याच्या भ्रमात हर्षकुमार बेधुंद होता. त्यानंतर ऑडिटमध्ये निधीत तफावत आल्याने कार्यालयात याची चर्चा सुरू झाली. वरिष्ठ पातळीपर्यंत सल्लामसलत सुरू झाल्याचे हर्षकुमारला कळाले होते. आता आपला भांडाफोड होणार याची कुणकुण लागल्याने त्याने आई-वडिलांच्या पासपोर्टसाठी नाशिक कार्यालयात ‘तत्काळ’मध्ये अर्ज केला. यात सामान्य प्रक्रियेपेक्षा जलद गतीने पासपोर्ट मिळतो. मात्र, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पोलिसांकडे याप्रकरणी अर्ज दाखल झाला आणि क्षीरसागर कुटुंबाचा विदेशात पळून जाण्याचा कट अपयशी ठरला.
४२ लाखांचे हिरे जडीत आठ चष्मे, ओम ऑप्टिकलकडून जबाब पूर्ण
प्रकरणाच्या प्राथमिक तपासात हर्षकुमारने ओम ऑप्टिकलमधून हिरे जडीत चष्मा घेतल्याचे समोर आले होते. मात्र, त्याने केवळ एकच नाही, तर हिरेजडित, गोल्ड कोटेड असलेले ४२ लाख रुपयांचे चष्मे खरेदी केले होते. यातील काही रक्कम ऑनलाइन, तर काही रोख दिली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ओम ऑप्टिकलच्या संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.