मेंदीचा ट्रेड बदलला; नवरा लग्नाआधीच नवरीच्या मुठीत, लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 21, 2023 13:34 IST2023-12-21T13:32:12+5:302023-12-21T13:34:06+5:30
आपल्या तळहातावरील मेंदीत आपल्या ‘प्रियतम’ नवऱ्याचे छायाचित्र काढून घेतले जात आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत.

मेंदीचा ट्रेड बदलला; नवरा लग्नाआधीच नवरीच्या मुठीत, लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ
छत्रपती संभाजीनगर : नवीन लग्न झालेला नवरा आपल्या बायकोची कड घेऊ लागला तर थट्टेने नातेवाईक म्हणतात की, ‘बघा, मुलगा बायकोच्या तालावर नाचू लागला!’ पण, आता तर लग्नाअधीच नवरा नवरीच्या मुठीत गेल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. त्यास कारणही तसेच आहे. लग्नसराईत पोर्ट्रेट मेंदीची क्रेझ नववधूमध्ये आली आहे. आपल्या तळहातावरील मेंदीत आपल्या ‘प्रियतम’ नवऱ्याचे छायाचित्र काढून घेतले जात आहे. यासाठी हजारो रुपये खर्च केले जात आहेत.
‘मेंदीवाले हाथ वो तेरे पायल वाले पांव... याद बहोत आते है मुझको तू और अपना गाव’ हे ‘मेंदीवाले हाथ’ या नावाच्या अल्बममधील गाणे खूप लोकप्रिय झाले होते, तसेही हिंदी व मराठी चित्रपटांत मेंदीवर अनेक गाणी लिहिली गेली व ती सुपरहिटही ठरली आहेत. भविष्यात पोर्ट्रेट मेंदीवर जर गाणे आले तर नवल वाटायला नको.
काय आहे पोर्ट्रेट मेंदी?
लग्नसराईत नववधू आपल्या हातावर सुंदर, सुरेख नक्षीकाम केलेली मेंदी काढतात. काळानुरूप त्या नक्षीकामात बदल होत गेले. आता नववधूंमध्ये तळहातावर आपल्या जीवनसाथीचे छायाचित्र काढण्याचा ट्रेंड आला आहे. होय. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी व त्याची आठवण आली की, तळहाताकडे पाहण्यासाठी हा नवीन ट्रेंड नववधूप्रिय ठरत आहे. मेंदीद्वारे छायाचित्र काढले जात आहे.
कशी काढली जाते ही मेंदी?
पोर्ट्रेट मेंदी हा सध्या लग्नसराईतील नववधूप्रिय प्रकार आहे. आपल्या जीवनसाथीचे हुबेहूब छायाचित्र मेंदीच्या साह्याने काढले जाते. हा प्रकार पहिले टॅटूमध्ये होता. ते पोर्ट्रेट टॅटू तळहात सोडून शरीरावर कुठेही काढले जातात. पोर्ट्रेट मेंदीत कार्बनचा वापर केला जातो. फोटोची कॉपी करून हातावर काढली जाते. मेंदीने टेन्सील होते. त्याद्वारे चेहरा काढला जातो. मेंदीचा रंग उडाला की, पोर्ट्रेटही निघून जाते. पोर्ट्रेट टॅटू शरीरावर कायमस्वरूपी राहते.
पोर्ट्रेट मेंदीसाठी किती खर्च येतो?
पोर्ट्रेट मेंदीत आर्टिस्ट जेवढा शार्प असेल तेवढी रक्कम वाढत जाते. नवीन मेंदी आर्टिस्ट ३ हजार ते ६ हजारांपर्यंत रक्कम आकारतात, तर अनुभवी शार्प आर्टिस्ट ८ हजार ते १० हजारांपेक्षा अधिक रक्कम आकारतात.
- सीमा कस्तुरे, आर्टिस्ट