थारला बांधून एटीएम मशीनच पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:36 IST2025-08-05T16:35:03+5:302025-08-05T16:36:00+5:30

चोरांनी आत प्रवेश करत सर्वप्रथम सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. बेल्टने मशीन ओढण्याआधी स्क्रू ड्रायव्हरने फोडण्याचा प्रयत्न केला.

The limit has been reached! Thieves tried to steal an ATM machine by tying it to a Thar SUV; Incident in Chhatrapati Sambhajinagar | थारला बांधून एटीएम मशीनच पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरची घटना

थारला बांधून एटीएम मशीनच पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरची घटना

छत्रपती संभाजीनगर : थार गाडीला बेल्ट बांधून त्याची दुसरी बाजू एटीएम यंत्रास बांधून लाखोंची रोख मशीनसह लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी मध्यरात्री तीन वाजता शहानूरवाडीत घडला. मात्र, मशीन ओढताना बेल्टच तुटल्याने चोरांचा प्रयत्न फसला.

एसबीआय बँकेच्या शहानूरवाडीतील शाखेलगतच एटीएम सेंटरही आहे. रविवारी मध्यरात्री तीन वाजता थार वाहनातून येत चारजणांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. बराच वेळ आत रेकी करून त्यांनी वाहनाला मागून दोन्ही बाजूंनी बेल्ट बांधले. बेल्टची दुसरी बाजू एटीएम मशीनला बांधली. एकाने गाडी सुरू करून एटीएम मशीन थेट बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्येच बेल्ट तुटला आणि चोरांच्या प्रयत्नावर पाणी फेरले गेले. या प्रकारामुळे मोठा आवाज झाल्याने चोरांनी क्षणात पोबारा केला. घटनेची माहिती कळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्यवस्थापक विशाल इंदूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आधी स्क्रू ड्रायव्हरने तोडण्याचा प्रयत्न
चोरांनी आत प्रवेश करत सर्वप्रथम सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. बेल्टने मशीन ओढण्याआधी स्क्रू ड्रायव्हरने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मशीन ओढल्यानंतर ती नेण्यासाठीदेखील काही अंतरावर वाहन उभे केल्याचा संशय पोलिसांना आहे. यापूर्वी शहरात बीड बायपास, वाळूज व पडेगाव परिसरात अशाच घटना घडल्या. मात्र, त्यातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले.

Web Title: The limit has been reached! Thieves tried to steal an ATM machine by tying it to a Thar SUV; Incident in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.