पतीने सवतीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवले, तणावात तरुणीने संपवले जीवन
By सुमित डोळे | Updated: September 27, 2023 12:26 IST2023-09-27T12:26:37+5:302023-09-27T12:26:59+5:30
कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना पतीच्या कृत्याने तरुणीचे टोकाचे पाऊल

पतीने सवतीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवले, तणावात तरुणीने संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ट असताना पतीने दुसऱ्या पत्नीचे छायाचित्र मोबाईलवर पाठवल्यानंतर तणावाखाली आलेल्या शेख अहेशा परवीन शेख अलमगीर (२५, रा. शहानगर, सातारा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना उघडकीस आली. तिचे वडील निवृत्त फौजदार आहेत.
फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेल्या अहेशाचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, कौटुंबिक कलह सुरू झाल्याने ती काही महिन्यांपासून माहेरी राहत होती. मात्र, हा वाद न्यायप्रविष्ट असताना तिच्या पतीने तिला दुसऱ्या पत्नीचे छायाचित्र पाठवले होते, असे तिच्या वडिलांनी सांगितले. त्या तणावातूनच तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी कुटुंबाचा जबाब नोंदवल्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, असे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल बबन शिंदे यांनी सांगितले.