निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:37 IST2025-03-27T18:33:45+5:302025-03-27T18:37:01+5:30

या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आई- वडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

The height of cruelty! Adopted 4 year girl beaten, broken limbs, brutally murdered by parents | निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून

निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून

- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: 
चार मुले होते म्हणून जालना येथून ६ महिन्यापूर्वी दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुकल्या मुलीची आई व वडिलांनीच हातपाय मोडून, अंगावर चटके देऊन निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी पहाटे ३ वाजता सिल्लोड शहरातील मुगलपुरा भागात उघडकीस आली. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी निर्दयी आई- वडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत चिमुकलीचे नाव आयात फईम शेख असे आहे. तर फौजिया शेख फईम ( २७) आणि शेख फईम शेख आयुब ( ३५, वर्ष दोघे रा.अजिंठा हल्ली मुक्काम  मुगलपुरा, सिल्लोड) असे आरोपींची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अजिंठा येथून १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात हे कुटुंब राहायला आले. तेव्हापासून या दोघांनी मिळून आयातचा मागील १५ दिवस अमानुष छळ केला. उपाशी ठेवत तिला चटके दिले. तसेच हातपाय पिरगाळून तोडले. त्यानंतर डोक्यात व पाठीत जोराने मारत तिला गंभीर जखमी केले. अमानुष मारहाण झालेल्या या चिमुकलीने अखेर गुरुवारी पहाटे ३ वाजच्या दरम्यान प्राण सोडले. 

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने या निर्दयी मातापित्याने पहाटे ३ वाजता सिल्लोड येथील एका कब्रस्तानमध्ये परस्पर दफनविधी उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी सिल्लोड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस अधीक्षक मयंक माधव,  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, फौजदार बी.एस. मुंढे, डी.आर. कायंदे यांनी घटनास्थळी जाऊन दफनविधी रोखला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी सिल्लोड शहरात पसरली. त्यानंतर नागरिकांनी रुग्णालय व पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघा आईवडिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. शोकाकुल वातावरणात सिल्लोड येथील कब्रस्तानमध्ये गुरुवारी सायंकाळी ५ वाजता चिमुकलीची मूळ आई व हत्या करणाऱ्या आई वडिलांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे सिल्लोड शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपी हे मूळचे अजिंठा येथील रहिवासी असून ते १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते. सिल्लोड येथे आल्यापासून त्यांनी मुलीचा छळ सुरू केला होता. इतक्या निर्दयीपणे मारहाण करून, चटके देऊन खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सिल्लोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: The height of cruelty! Adopted 4 year girl beaten, broken limbs, brutally murdered by parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.