गावची स्वच्छता करणाऱ्यांना बाळापुरात ध्वज फडकवण्याचा मान; महिला सरपंचांचा कौतुकास्पद निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:16 IST2026-01-27T16:15:01+5:302026-01-27T16:16:23+5:30
गावातील कचरा आणि नाले उपसणाऱ्या एका कष्टकरी हातांना यंदा चक्क राष्ट्रध्वज फडकवण्याचा सर्वोच्च मान देण्यात आला.

गावची स्वच्छता करणाऱ्यांना बाळापुरात ध्वज फडकवण्याचा मान; महिला सरपंचांचा कौतुकास्पद निर्णय!
छत्रपती संभाजीनगर: प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव असतो, पण छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) गावाने यंदा या उत्सवाचा असा एक चेहरा पाहिला, जो माणुसकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. गावातील कचरा आणि नाले उपसणाऱ्या एका कष्टकरी हातांना यंदा चक्क राष्ट्रध्वज फडकवण्याचा सर्वोच्च मान देण्यात आला. सरपंच नीता सुनील गिऱ्हे यांच्या या एका निर्णयाने ग्रामपंचायत कर्मचारी शाहू महाराज आदमाने यांचे आयुष्य सार्थकी लागले.
२० वर्षांच्या कष्टाचा 'पांढरा शुभ्र' सन्मान
गेल्या दोन दशकांपासून शाहू महाराज आदमाने हे ऊन-पावसाची पर्वा न करता गाव स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहेत. ज्या हातांशी हस्तांदोलन करतानाही अनेकदा समाज संकोच करतो, त्याच हातांना तिरंगा फडकवण्याचा मान मिळणार, असा निरोप जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांचा स्वतःवर विश्वासच बसेना. आयुष्यभर मळक्या कपड्यात राबलेल्या या 'स्वच्छता दूताने' आयुष्यातला पहिला कोरा करकरीत पांढरा शुभ्र पोशाख खरेदी केला. तो केवळ वेष नव्हता, तर त्यांच्या इमानदारीला मिळालेली पोचपावती होती.
कष्टकऱ्यांना दिला सलामीचा मान
सोमवारी सकाळी जेव्हा शाहू महाराजांच्या हातात तिरंग्याची दोरी देण्यात आली, तेव्हा त्यांचे हात स्पष्टपणे थरथरत होते. ती थरथर भीतीची नव्हती, तर २० वर्षांच्या उपेक्षेचा अंत होऊन मिळालेल्या कृतज्ञतेची होती. त्यांनी जेव्हा दोरी ओढली आणि तिरंगा आकाशात झेपावला, तेव्हा केवळ फुलांचाच नाही तर गावकऱ्यांच्या आनंदाश्रूंचाही वर्षाव झाला. मेहनतीचा गौरव केवळ शाहू महाराजच नव्हे, तर गावातील अतिशय मेहनती नागरिक आणि भाजीपाला व्यवसाय करणारे आसाराम सांगळे यांनाही जिल्हा परिषद शाळेसमोरील ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. सामान्य माणसाला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न सर्वांच्याच मनाला भावला.
यावेळी बाळापूरच्या सरपंच नीता गिऱ्हे, उपसरपंच अर्जुन जौक, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पवार, सुनीताबाई अवताडे, वंदनाबाई वाघ, आकाश बांगर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, जनार्दन वाघ, सुनील वाघ, आसाराम सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक विवेक पिटेकर, शिक्षिका प्रतिभा सुरासे, अंगणवाडी शिक्षिका मीरा जौक, रुखमन जौक, अर्चना जौक, सोनाबाई गिऱ्हे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्यकर्म
"हा केवळ ध्वजारोहण सोहळा नव्हता, तर तो त्या घामाचा आणि निष्ठेचा सन्मान होता ज्याने माझ्या गावाला आरोग्य दिलं. शाहू महाराजांच्या हातांनी तिरंगा फडकताना पाहणं, हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पुण्य आणि आत्मिक समाधान आहे."
- नीता सुनील गिऱ्हे (सरपंच, बाळापूर)