तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:42 IST2022-03-08T19:41:44+5:302022-03-08T19:42:06+5:30
घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी काढली आणि दुर्घटना झाली.

तलप ठरली जीवघेणी! बिडी पेटविताना गळ्यातील रुमालच पेटला; गंभीर भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
औरंगाबाद: बिडीचे व्यसन ८१ वर्षिय वृद्धाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच समेार आली. निमखेड(ता. फुलंब्री) येथे १ मार्च रोजी बीडी पेटविताना गळ्यातील रूमालाने पेट घेतल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रंगनाथ लिंबाजी जिवरग असे मृताचे नाव आहे. रंगनाथ यांना बिडी चे व्यसन होते. १ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते निमगाव येथील त्यांच्या घरी बसलेले असताना त्यांना बिडी ओढण्याची तलप झाली. यामुळे त्यांनी खिशातील बिडी तोंडात धरून पेटविण्यासाठी आगकाडी ओढली. बिडी पेटविताना त्यांच्या गळ्यातील रूमालाने पेट घेतला. गळ्यातील रूमालाची आग कशी विझविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.
मात्र, रूमालासह शरिरावरील अन्य कपडेही पेटल्याने त्यांचे हात, गळा आणि पाठीला चांगलेच जळाले. यानंतर त्यांना त्यांचा मुलगा नारायण रंगनाथ जिवरग यांनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान ७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक मोरे हे तपास करीत आहेत.