छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बाहेरच्या मंत्र्याकडे द्यावे, अशी मागणी शिंदेसेनेतील काही जणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे असा काही निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे देण्याची मागणी सुरू आहे. मंत्रिपद व खाते मिळण्यासाठी चढाओढ होती, तशीच परिस्थिती पालकमंत्रिपदासाठी निर्माण झाल्यामुळे अद्याप काहीही निर्णय झालेला दिसत नाही. ३६ पैकी ११ जिल्ह्यांत या पदासाठी रस्सीखेच आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरचादेखील समावेश आहे. समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट हे मीच पालकमंत्री होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत. तसेच पालकमंत्री झाल्यावर माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेल्या कामांबाबत पुनर्विचार करणार असल्याचेही ते सांगत आहेत, तर दुसरीकडे भाजपने ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना पालकमंत्रिपद देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली आहे. महायुतीतील या दोन्ही पक्षांमध्ये पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, असाही निर्णय होणे शक्य आहे. शिंदेसेनेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे पद देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१९९९ नंतर किती स्थानिकांना संधी?१९९९ पासून २०२२ पर्यंत बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्याकडेच पालकमंत्रिपद होते. यात प्रामुख्याने स्व. पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री रामदास कदम, दीपक सावंत, सुभाष देसाई यांचा उल्लेख करावा लागेल. २०२२ साली खा. संदीपान भुमरे यांच्याकडे, त्यानंतर २०२४ मध्ये आ. अब्दुल सत्तार यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
भाजपने घेतला ठरावभाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाट आणि शहराध्यक्ष शिरीष बाेराळकर यांनी पालकमंत्रिपद ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांना मिळावे यासाठी ठराव घेऊन तो प्रदेश समिती व मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही मंगळवारी मागणी केल्याचे बोराळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजप व शिंदेसेनेच्या रस्सीखेचीत बाहेरचा मंत्री पालकमंत्री म्हणून येण्याची शक्यता आहे, यावर बोराळकर म्हणाले, आमची मागणी कायम आहे, बाहेरचा पालकमंत्री नेमला तरी आमची हरकत नसेल.