सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

By विकास राऊत | Updated: December 12, 2024 12:06 IST2024-12-12T12:05:42+5:302024-12-12T12:06:12+5:30

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत

the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop | सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तराफ्यातून कसरत करीत शाळा गाठावी लागते. जायकवाडी धरणात जमिनी गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी बॅक वॉटरने वेढलेल्या शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या व्यथा जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत गेल्या. परंतु त्यावर आजवर काहीही तोडगा निघालेला नाही. सरकार १०० कुटुंबांसाठी १०३ कोटींतून पूल बांधण्याचा निर्णय केव्हा घेणार, असा प्रश्न कायम आहे.

सोमवारी जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना सा. बां. विभाग, जलसंपदा विभागासह महसूल प्रशासनाला दिल्या. मागील अनेक वर्षांपासून सुमारे १०० कुटुंब कायमस्वरूपी रस्ता किंवा पुलाच्या मागणीसाठी प्रशासनापासून मंत्रालयापर्यंत लढा देत आहेत. अद्याप त्यांना यश आलेले नाही. या १०० कुटुंबांसाठी १०३ कोटींचा पूल बांधावा लागणार आहे. तो पूल बांधणार कोण, असा प्रश्न आहे.

भिवधानोरा व परिसरातील गावांतील शेतकरी शेतवस्त्यांवर राहतात. त्यातील काही कुटुंब शिवना नदीच्या पलीकडे राहतात. सध्या जायकवाडीचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात आहे. पाण्यामुळे नागरिकांचा गावांशी संपर्क दुर्मिळ झालेला आहे. रस्ता नाही, पुलाचे बांधकाम कोण करणार हे माहिती नाही. हे त्रांगडे असताना मुलांना मात्र भिवधानोरा गावापर्यंत थर्माकोलच्या तराफ्यातून पाण्यातून वाट काढीत जावे लागते. शिवना नदीतून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत तराफ्यातून मुलांना शाळा गाठावी लागत असल्याप्रकरणी मध्यंतरी ओरड झाल्यानंतर एनडीआरएफने एक बोट तेथे दिली. परंतु त्या बोटीचा काही उपयोग नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अधिवेशनात काय झाली होती चर्चा?
पावसाळ्यात गावाचे दोन भाग होतात. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे फिरून जावे लागते. तेथे रस्ता बांधण्याऐवजी पूल बांधावा लागेल. त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च होणार आहे. जलसंपदा विभाग ९० कोटी खर्च करू शकत नाही. ग्रामविकास व सा. बां. विभागाशी चर्चा केली जाईल, असे उत्तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सतीश चव्हाण यांनी २०२३ मध्ये विधानसभा अधिवेशनादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले होते.

उपाययोजनांवर अहवाल देण्याची सूचना
भिवधानोरा येथील बॅक वॉटर आणि नागरिकांच्या तक्रारी, सद्य:स्थितीवरून दीड तास बैठक चालली. शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या, शाळकरी मुलांच्या अडचणी आहेत. तेथे काय उपाययोजना करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल देण्यास सर्व यंत्रणांना सांगितले.
-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

एवढी अनास्था कशासाठी?
न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या निकालानंतर प्रशासनाने बोट दिली, परंतु ती चालविण्यासाठी ऑपरेटर दिला नाही. एवढी अनास्था का आहे, हे कळत नाही.
-विष्णू काळे, रहिवासी, भिवधानोरा शेतवस्ती

पाहणीनंतर पुढे काहीच नाही
अधिवेशनात शिवना नदीवर पूल बांधणीचे प्रकरण चर्चेला आले. त्यानंतर पूल बांधण्याचा मुद्दा समोर आल्याने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तेथे येऊन पाहणी करून गेले. सध्या जायकवाडीचे बॅक वॉटर आणि नदीचे पाणी यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.
-बाबासाहेब चव्हाण, उपसरपंच, भिवधानोरा ग्रामपंचायत

Web Title: the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.