मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 13:50 IST2022-02-21T13:49:18+5:302022-02-21T13:50:41+5:30
तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान सायकल सफरीवर गेले होते.

मित्रांची सायकल सफर अखेरची ठरली; तीन मुलांचा भांगासीमाता गडाजवळील शेततळ्यात बुडून मृत्यू
वाळूज ( औरंगाबाद ) : शेकापूर शिवारातील शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. प्रतिक आनंद भिसे ( १४ ) , तिरुपती मारुती कुडाळकर ( १४ ), शिवराज संजय पवार ( १६ ) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. तिघेही रविवारी दुपारी सायकल सफरीवर गेले होते. त्यानंतर आज ही घटना उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारा संगम सोसायटीमध्ये राहणारी प्रतिक, तिरुपती आणि शिवराज हे तिघे मित्र रविवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान भांगासी माता गडाकडे सायकल सफरीवर गेले होते. सायंकाळी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तिघांचाही खूप शोध घेतला. कुठेच मिळून न आल्याने नातेवाईकांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आज सकाळी शेकापूर शिवारातील नारायण वाघमारे यांच्या शेताजवळ दोन सायकल आढळून आल्या. पुढे पाहणी केली असता शेत तळ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.